नाशिक : 77 बैलगाड्यांच्याद्वारे मांडव मिरवणुक; खा. शरद पवारांच्या हस्ते होणार अनावरण

मांडव मिरवणूक www.pudhari.news

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्त सोमवारी (दि. 6) हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवस्मारक समितीच्या वतीने 77 बैलगाड्या मिरवणुकीद्वारे शिवतीर्थावर मांडव उभारण्यात आला.

शनिवारी (दि. 4) श्री विठ्ठल मंदिरात मांडव बेत (पानसुपारी) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार (दि. 5) ते शुक्रवार (दि. 10) दरम्यान होणार्‍या विविध कार्यक्रमांची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी दिली. मांडव मिरवणूक फुलाबाई चौकातून सुभाष पेठ, गांधी चौक मार्गे भाजीमंडईतून गणेशनगर, एसटी बसस्थानकामार्गे मेनरोडने शिवतीर्थापर्यंत काढण्यात आली. 77 बैलगाड्यांचे पूजन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, कळवणच्या प्रथम नगराध्यक्षा सुनीता पगार, उपनगराध्यक्षा लता निकम, सोनाली देवरे, सुनीता निकम, वर्षा शिंदे यांच्यासह 77 महिलांनी केले. शिवतीर्थ येथे कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी सपत्नीक विधिवत मांडवपूजन केल्यानंतर मांडव टाकण्यात आला. 77 महिलांच्या हस्ते पुतळ्याचे व चबुतर्‍याचे पूजन करून हजारो शिवप्रेमींच्या साक्षीने शिवछत्रपतींची सामूहिक महाआरती करण्यात आली. योगेश मालपुरे, राकेश हिरे यांनी सूत्रसंचालन केले. गेल्या बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवतीर्थ येथे विराजमान झाल्यानंतर शिवस्मारक समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 8 मार्चपर्यंत गांधी चौकात रात्री 8 ते 10 या वेळेत शिवचरित्र संगीत कथा कार्यक्रम, शिवशक्ती याग, शुक्रवारी (दि. 10) दुपारी शिवशाहीर कार्यक्रम, तर दुपारी 4 ला मान्यवरांच्या हस्ते पुतळा अनावरण होईल. सायंकाळी 6 ला लेझर लाइट आणि फायर शो होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी दिली.

शुक्रवारी होणार अनावरण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी (दि. 10) दुपारी 4 ला माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि युवराज संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जिल्ह्यातील शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार नितीन पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : 77 बैलगाड्यांच्याद्वारे मांडव मिरवणुक; खा. शरद पवारांच्या हस्ते होणार अनावरण appeared first on पुढारी.