ना. गिरीश महाजन : खडसे यांनी दूध संघात निवडून येऊन दाखवावे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. याठिकाणी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांची सत्ता आहे. दूध संघातील आ. खडसे यांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. सोमवारी, दि.14 रात्री दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक केली आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. आता राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना आव्हान दिले आहे.

‘”दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी निवडून येऊन दाखवावे. त्यांचा पराभव अटळ आहे. त्यांचे कारनामे लवकरच बाहेर येतील”, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. त्यात एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजपचे मंत्री व विरोधक गिरीश महाजन तसेच भाजप व एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. यासंदर्भात मंत्री महाजन जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की एकनाथ खडसे यांनी अनेक कारनामे केले आहेत. त्यांनी आपल्यावर खोटा गुन्हाही दाखल केला आहे, असे अनेक कारनामे लवकरच बाहेर येतील.

आता आमची वेळ आली…

एकनाथ खडसे यांनी कायद्याचा एवढा खोटा आधार घेतला आहे. आता आमची वेळ आली आहे. त्यांनी कायद्याला सामोरे जावे. जिल्हा दूध संघाचीही चौकशी सुरू आहे. त्यांनी पाच वर्षांत तेथे काय केले, काय नाही केले, हेही लवकरच जनतेसमोर येईल. आम्ही त्यांच्यासारखा एकही खोटा गुन्हा दाखल करणार नाही. जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीबाबतही गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांना आव्हान दिले. खडसे आमच्या उमेदवारांवर आक्षेप घेत आहेत. ते म्हणतील तो उमेदवार आपण त्यांच्याविरोधात देऊ. त्यांनी निवडून येऊन दाखवावे, असे खुले अव्हानही गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिले.

हेही वाचा:

The post ना. गिरीश महाजन : खडसे यांनी दूध संघात निवडून येऊन दाखवावे appeared first on पुढारी.