निजामपूर जवळ नंदुरबार-पुणे बसचा अपघात; दोन्ही वाहनांचे नुकसान, सात प्रवासी जखमी

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील निजामपूर-साक्री रस्त्यावर काल (दि. २) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास निजामपूर जवळ नंदुरबार-पुणे बस व समोरुन येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक होऊन भिषण अपघात झाला. या अपघातात सात जण जखमी झाले.

निजामपूरच्या दिशेने अहमदाबादकडे कांदे भरून जाणारा ट्रक (क्र एमएच-४१-एजी-५२५२) व नंदुरबारहून पुण्याला जाणारी एसटी बस(क्र.एमएच-३१- सीयू-६७३१)यांच्यात धडक झाली. बसच्या कंडक्टर बाजूस ट्रकची डावी बाजू ठोकली गेली. या बसमध्ये तब्बल 37 प्रवासी प्रवास करत होते .बसचालक सागर गोरे आणि वाहक हरीश गणपत भोळे (दोन्ही रा.नाशिक आगार) यासह इतर पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनास्थळी साक्रीचे आगार प्रमुख किशोर अहिरराव,निजामपूरचे एपीआय हनुमंत गायकवाड, पो.कॉ.दीपक महाले,अर्जुन पवार आदी घटनास्थळी दाखल झाले होते.जखमींना पी फॉर्मचे वाटप करण्यात आले.स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले व क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला.

The post निजामपूर जवळ नंदुरबार-पुणे बसचा अपघात; दोन्ही वाहनांचे नुकसान, सात प्रवासी जखमी appeared first on पुढारी.