निताणेच्या युवकाची २८ लाखांची फसवणूक; माजी आमदारांसह चार जणांवर गुन्हा दाखल 

नाशिक : शिक्षण संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत २८ लाख रुपये घेतल्याची तक्रार माजी आमदार, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे पदाधिकारी अपूर्व हिरे यांच्याविरोधात करण्यात आली आहे. सटाणा पोलीस
ठाण्यात हिरे यांच्यासह चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल
हिरे घराण्याच्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जाळे मालेगावसह नाशिक,सटाणा अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये पसरलेले आहे. या शिक्षण संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत काही महिन्यांपूर्वी आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची तक्रर करण्यात आली होती. परंतु या प्रकाराशी संबंध नसल्याचा दावा संस्थेच्या वतीने करण्यात आला होता. याच तक्रारीची पुनरावृत्ती झाली आहे. निताणे ता बागलाण येथील विनोद देवरे यांची भावजय मोहिनी देसले यांना महात्मा गांधी विद्यामंदिर मालेगाव किंवा नाशिक येथे शिक्षकपदावर नोकरी लावून देण्याचे आमिष माजी आमदार अपूर्व हिरे, आदित्य पुतानपुरे, लंकेश मिस्तरी, प्रवीण देवरे यांनी दाखविले.

हेही पाहा > महाराष्ट्र पोलिस अकादमीतील भावी फौजदार 'सैराट'! शासनाच्या नियमांची धज्जीया VIDEO VIRAL

चार वर्षांपासून हा प्रकार सुरू

नोकरी लावून देण्यासाठी वेळोवेळी पैशांची मागणी केल्याची तक्रार देवरे यांनी केली. २१ लाख ५० रुपये बँकेच्या वेगवेगळ्या खात्यांवर भरले तर साडेसहा लाख रुपये रोख स्वरूपात दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. चार वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. नोकरी लावून दिली नाही आणि पैसेही परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चारही संशयितांविरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

एकास अटक
सटाणा पोलिसांनी या प्रकरणी पुतानपुरे यास अटक केली असून न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास तक्रारदारांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.