निफाडचा आरोग्य विभाग ‘सलाईनवर’! तीस टक्के पदे रिक्त असल्याने मनुष्यबळाची कमतरता 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : सुमारे पाच लाख लोकसंख्या असलेल्या निफाड तालुक्यात कोरोनाने विळखा अधिक घट्ट केला आहे. रोज तीनशेहून अधिक रुग्ण निफाड तालुक्यात आढळत आहेत. मृत्युदरही वाढला आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीशी झुंज देण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी सैनिकासारखे लढत आहेत. निफाड तालुक्यातील आरोग्याबाबतची स्थिती धोकादायक वळणावर असताना शासनाकडून पदभरती न झाल्याने तीस टक्के कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. विविध संवर्गाच्या १३४ पैकी अवघे ९० अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, मंजूर पदांच्या भरतीअभावी तीस टक्के कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. 

दहा आरोग्य केंद्रांमार्फत निफाड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचे शिवधनुष्य पेलले जाते. महिलांची प्रसूती, बालकांचे लसीकरण, साथरोगाचे नियंत्रण, आरोग्य योजनांचे आर्थिक लाभ दिले जातात. निफाड तालुका बिगरआदिवासी भागात गणला जात असल्याने शासनाच्या नियमानुसार ३० हजार लोकसंख्येला एक आरोग्य केंद्र व पाच हजार लोकसंख्येला एक उपकेंद्र, असा निकष पाहता निफाड तालुक्यात १५ प्राथमिक आरोग्य केंद्र व १०० उपकेद्रांची व त्याअंतर्गत सर्व सवंर्गाच्या १६० कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. पण, सध्या दहा आरोग्य केंद्रे व ५२ उपकेंद्रे आहेत. स्वतःच आखून घेतलेल्या धोरणावरच शासनाकडून हरताळ फासला जात आहे. दुसरे विदारक चित्र म्हणजे शासनाकडून सध्या अधिकारी व कर्मचारी अशी १३४ पदे मंजूर आहेत. त्यातील ४४ पदे वर्षानुवर्षापासून रिक्तच आहेत. त्याचा परिणाम स्वाभाविकच आरोग्य सेवेवर होत आहे. रिक्त जागांचा पदभार इतर कर्मचाऱ्यांकडे दिला जात आहे. त्यामुळे एका-एका आरोग्य सेवक-सेविकेच्या खांद्यावर १५ ते २० हजार लोकसंख्येचा भार आहे. अतिरिक्त पदभार असेल तर अधिकचे वेतन देण्याचा नियम आहे. तो लाभही कर्मचाऱ्यांना मिळत नाही. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

कोरोनाची दुसरी लाट सुसाट असल्याने पंधरा दिवसांत दोन हजार नागरिक बाधित झाले. ८० जणांना प्राण गमवावे लागले. आरोग्य यंत्रणेकडे बोट दाखविले जात असताना रिक्त पदांबाबत कुणीही ब्र शब्द काढत नाही. सर्वेक्षण, संपर्कातील रुग्णांना चाचणीसाठी पाठविणे अशी कामे अपुऱ्या मनुष्यबळामुळे रखडत आहेत. तत्काळ ही पदभरती होणे गरजेचे आहे. 
निफाड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णाची संख्या पाचशेच्या दिशेने धाव घेत आहे. त्यामुळे शासनाने रिक्त पदे भरण्याबरोबरच वाढीव पदे मंजूर करावीत, अशी मागणी होत आहे. 

पाच वर्षांत आरोग्य कर्मचारी भरती न झाल्याने रिक्त पदे वाढली आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना रिक्त पदांमुळे उद्भवणाऱ्या समस्या कळविल्या आहेत. निफाड तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी अधिकची पदे मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 
- दिलीप बनकर, आमदार, निफाड 

कर्मचारी निवृत्त होत असताना वर्षानुवर्ष नोकरभरती खोळंबली. त्यात नियमानुसार आदिवासी भागातील पदे रिक्त ठेवता येत नाही. निफाडसह बिगरआदिवासी तालुक्यात जागा रिक्त राहत असल्याने आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम होत आहे. कर्मचारी बदल्यांमध्ये काही जागा भरण्याचा प्रयत्न करणार आहे. 
- बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

रिक्त जागांची माहिती जिल्हा परिषद कार्यालयाला पाठविली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याची गरज आहे. सध्याची उद्‌भवलेली परिस्थिती निवळण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना निफाड तालुक्यातील रिक्त जागांवर तात्पुरती नियुक्ती द्यावी. 
- डॉ. नवलसिंग चव्हाण, तालुका आरोग्याधिकारी, निफाड 

संवर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे 

वैद्यकीय अधिकारी २० १४ ६ 
औषधनिर्माण अधिकारी ९ ६ ३ 
आरोग्य सहाय्यिका १० ७ ३ 
आरोग्य सहाय्यक ११ ११ ० 
आरोग्यसेविका ६२ ४१ २१ 
आरोग्यसेवक २२ १९ ३