निफाडच्या दोन शेतकऱ्यांची फसवणूक; कारखान्याकडे निघालेले ट्रक उसासह लंपास 

निफाड (जि.नाशिक) : आतापर्यंत द्राक्षबागवाल्यांची व्यापारी फसवणूक करत होते. आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत ऊसतोड कामगार व मालक, ट्रकचालकांची मजल गेल्यावर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी? कोणावर भरवसा ठेवावा? कारखाने हात वर करायला लागले तर शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल. अशा प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांकडून यायला सुरूवात झाली आहे. काय घडले नेमके?

निफाडच्या दोन शेतकऱ्यांची फसवणूक

निफाड येथील ऊस उत्पादक शेतकरी शरद शिंदे आणि कृष्णा राऊत यांच्या शेतातील तयार झालेला ऊस गाळपासाठी रावळगाव येथील एस. जे. शुगर डिस्टिलरीज ॲन्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याचे कर्मचारी सुरेश निरभवणे आणि निवृत्ती ढोमसे यांनी घेण्याचे ठरविले. त्यानुसार ११ जानेवारीला त्यांनी ऊसतोडणी करून दोन ट्रकमध्ये ३० टन इतका माल कारखान्यात पोचविला. पुन्हा दुसऱ्यांदा १५ जानेवारीला ७४ हजारांचा ३० टन ऊस (एमच ०४, एएल ००३१) आणि (एमएच १२, एक्यू ३६५३) या ट्रकांमध्ये भरून नेला. मात्र हा ऊस कारखान्याकडे पोचला नसल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राहुल हिंगे यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिली.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

तक्रारीनुसार गुन्हा दाखल

ही बाब लक्षात येताच शरद शिंदे यांनी कारखान्याचे गटपर्यवेक्षक सुरेश निरभवणे, निवृत्ती डोंगरे आणि दोन्ही मालमोटारींचे चालक यांनी संगनमताने फसवणूक केल्याची तक्रार निफाड पोलिस ठाण्यात नोंदविली. निफाड पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

गंभीर प्रकार उघडकीस

निफाड येथील दोन शेतकऱ्यांचा ३० टन ऊस कारखान्याचे कर्मचारी व ट्रकचालकांकडून लंपास केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, ७४ हजारांची फसवणूक झाल्याची फिर्याद संबंधित शेतकऱ्यांकडून निफाड पोलिसांत नोंदविण्यात आली. 

 

आतापर्यंत द्राक्षबागवाल्यांची व्यापारी फसवणूक करत होते. आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत ऊसतोड कामगार व मालक, ट्रकचालकांची मजल गेल्यावर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी? कोणावर भरवसा ठेवावा? कारखाने हात वर करायला लागले तर शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल. 
-सोमनाथ बोराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राज्य कार्यकारिणी सदस्य