निफाडच्या नगरसेवकाला लाखोंचा गंडा! बाजूने निकाल लावून देण्याच्या बोलीवर उकळले २० लाख

निफाड (नाशिक) : चांगल्या वकिलामार्फत निकाल लावून देण्याच्या बोलीवर निफाडचे नगरसेवक किरण कापसे यांच्याकडून पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील पंकज होळकर याने २० लाख रुपये उकळले. याबाबत निफाड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात झाली. वाचा काय घडले नेमके?

वकिलामार्फत निकाल लावून देण्याची बोली

नगरसेवक कापसे यांनी वडनेरभैरव (ता. चांदवड) येथे जमिनीचा व्यवहार केला होता. मात्र त्या जमिनीवर सुरू असलेल्या मुंबई उच्च न्यायालयातील केसमध्ये ओळखीच्या मोठ्या वकिलामार्फत निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, असे पंकज होळकर याने सांगून कापसे यांच्याकडे ३० लाखांची मागणी केली. यानंतर संशयित होळकर याने कापसे यांचा विश्‍वास संपादन करत डिसेंबर २०१९ मध्ये होळकर यांनी सांगितलेल्या नावे पंधरा लाख रुपये आरटीजीएसद्वारे व त्यानंतर पाच लाख रुपये रोख असे एकूण २० लाख रुपये कापसे यांच्याकडून उकळले. यानंतर कापसे यांनी होळकर यांना वकिलाचे नाव सांगा व भेट घालून द्या, असे सुरू केल्यावर होळकर यांनी टाळाटाळ करण्यास सुरवात केली.

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

नगरसेवक कापसे यांना आपण फसलो गेल्याचे समजले, त्यानंतर संबंधित गोष्टींचा पाठपुरावा करून पैसे मागण्याचा तगादा लावल्याने होळकर यांनी बँकेचे एकूण पंधरा लाखांचे धनादेश दिले. मात्र हे धनादेश बाऊन्स झाले व आजपर्यंत पैसे देण्यास टाळाटाळ केली. पैसे मिळतील यामुळे बरेच दिवस वाट पाहिली. मात्र आशा धूसर झाल्याने शेवटी नगरसेवक कापसे यांनी निफाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर संशयित होळकरविरुद्ध गुन्हा दाखल झाला.  

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या