निफाडला शासकीय वाळू डेपोवर 25 जणांकडून दरोडा

वाळू चोरीला,www.pudhari.news

निफाड : पुढारी वृत्तसेवा- निफाड तालुक्यातील जळगाव येथे शासकीय वाळू डेपोवर वीस ते पंचवीस इसमांच्या टोळक्याने दरोडा घालून एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची वाळू आणि पंधरा हजार रुपये रोख असा एक लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार निफाड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

निफाड पोलिस ठाण्याकडून प्राप्त माहितीनुसार, मौजे जळगाव येथील गट नंबर 426 आणि 423 मध्ये मेसर्स टी. ई. जंजिरे इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स यांचा शासकीय वाळू डेपो आहे. येथे साठवलेल्या वाळू चोरीसाठी दरोडेखोरांच्या टोळीने वीजपुरवठा खंडित केला. तसेच सीसीटीव्हीच्या वायर कापून वीस ते पंचवीस जणांच्या टोळीने फिर्यादी आणि साक्षीदार यांना शस्त्रास्त्रांचा धाक दाखवत मारहाण केली. पाच ते सात ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्याने डेपोतील 40 ते 50 ब्रास वाळू तसेच फिर्यादीकडील पंधरा हजार रुपये रोख आणि वाळूच्या पावत्या असा 1 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडा घालून चोरून नेला. याप्रकरणी कल्पेश कैलास कुंदे यांनी निफाड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. याप्रकरणी निफाड पोलिसांनी संशयित आरोपी प्रवीण वडघुले, शुभम वडघुले, अमोल देशमुख, उत्तम निर्भवणे, चेतन सुधाकर निर्भवणे आदींसह 20 ते 25 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संशयितास 21 जूनपर्यंत पोलिस कोठडी

नासिक ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर नीलेश पालवे, पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम, सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर पाटील, पोलिस उपनिरीक्षक आनंद पठारे यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. या प्रकरणातील संशयित आरोपी उत्तम निर्भवणे यास पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 21 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा –