निफाडला ६५ ग्रामपंचायतींचा उडाला धुराळा! गावगुंडीचे राजकारण गतिमान

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : मार्च ते डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा गुरुवारपासून धुराळा उडाला आहे. प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्याने गावगुंडीचे राजकारण गतिमान झाले आहे. मतदारयाद्यांच्या निमित्ताने ६५ गावांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जानेवारीत निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार असल्याने मोर्चेबांधणीला वेग आला आहे. 

मोर्चेबांधणीला वेग
तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींसह पुढील पाच वर्षांत होणाऱ्या एकूण ११९ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची १४ डिसेंबरला सोडत असून, त्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील लासलगाव, ओझर, सायखेडा, उगाव आदी ६२ ग्रामपंचायतींचा कालावधी चार महिन्यांपूर्वी, तर औरंगपूर, भेंडाळी, ओणे या तीन ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरमध्ये पूर्ण होत आहे. ६२ ग्रामपंचायतींमध्ये सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. जानेवारीच्या मध्यावर निवडणुकीचे रणशिंग फुकले जाण्याची चिन्हे आहेत. बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

१० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार
आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्या समर्थकांमध्ये काट्याच्या लढती होतील. तालुक्यातील ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी आता राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ रंगणार आहे. सत्तेचा बाल्लेकिल्ला राखण्यासाठी आतापासूनच रणनीती आखली जाणार आहे. तर सायखेड्यात पॅनल न होता वॉर्डनिहाय स्वतंत्र निवडणूक लढून नंतर विजयी उमेदवार एकत्र येण्याची परंपरा यंदाही कायम राहते का? हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. प्रशासक जाऊन गावाला हक्काचा सरपंच मिळणार आहे. ६२ ग्रामपंचायतींच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्या असून, ७ डिसेंबरपर्यंत त्यावर हरकत नोंदवून १० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

सरपंच आरक्षणाकडे तालुक्याचे लक्ष... 
सध्या ६५ ग्रामपंचातींचा रणसंग्राम महिनाभरात रंगणार आहे. त्यांच्यासह उर्वरित ५४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण १४ डिसेंबरला निघणार आहे. पिंपळगाव बसवंत, चांदोरी, पालखेड, कसबे सुकेणे आदी मोठ्या ग्रामपंचायतींच्या गावपुढाऱ्यांचे लक्ष या आरक्षणाकडे असणार आहे. 

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, १० डिसेंबरला अंतिम प्रसिद्धी दिली जाईल. - शरद घोरपडे (तहसीलदार, निफाड)