निफाड तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट! पिंपळगावात चार दिवसांत सहा मृत्यू 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : निफाड तालुक्यात फेब्रुवारीत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्यास सुरवात झाली. मात्र, यातून नागरिकांनी धडा न घेतल्याने मार्चमध्ये दुसरी लाट आली आहे. पिंपळगाव बसवंत शहरात कोरोनाचा विस्फोट झाला असून, चार दिवसांत सहा जणांचे श्‍वास थांबले आहेत. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे महिन्याभरात दोन हजार जण कोरोनाच्या कवेत आले आहेत. प्रशासनाकडून कठोर उपाययोजना होत असताना नागरिकांनी जबाबदारीचे भान राखण्याची गरज आहे. 

गेल्या वर्षी कोरोनाने निफाड तालुक्यात ११२ हून अधिक नागरिकांचा जीव गेला होता. गेल्या वर्षापेक्षा यंदा संसर्गाच्या प्रमाण अधिक असल्याने प्रशासन हादरले आहे. संसर्ग रोखण्यासाठी ठोस हालचालींची गरज आहे. काही निर्बंध प्रशासनाने लावले, पण त्याकडे कानाडोळा करून नागरिक विनामास्क व सामाजिक अंतर या नियमांना पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे मार्चमध्ये निफाड तालुक्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. निफाडमध्ये दोन हजार नागरिकांना मार्चमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यातील दीड हजार रुग्ण उपचाराखाली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मृत्युदराचा आलेख धडकी भरविणारा आहे. दोन महिन्यांत तब्बल ८० जणांना प्राण गमवावे लागले. पिंपळगाव शहरात चार दिवसांत सहा नागरिकांनी अखेर श्‍वास घेतला. त्यात एका तरुणाचा समावेश आहे. अजूनही पन्नासहून अधिक रुग्णांना ऑक्सिजन लावल्याने मृत्यूशी त्यांची झुंज सुरू आहे. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

तालुक्यात पिंपळगाव बसवंत, ओझर, सायखेडा, निफाड, लासलगाव ही व्यापारी बाजारपेठेची गावे कोरोनाला पूरक स्थिती निर्माण करणारी आहेत. गुरुवारी (ता. १) एकाच दिवशी १९० रुग्ण निफाड तालुक्यात आढळले. निर्बंधांच्या सक्तीने अंमलबजावणीशिवाय ही धोकादायक स्थिती आटोक्यात आणता येणे शक्य नाही. कोरोनाने धोक्याची पातळी ओलांडल्याने तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, तालुका आरोग्याधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण यांनी ओझर, नैताळेसह व्यापारी पेठांतील शहरात जाऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. 

एकूण बाधित रुग्ण ः ६,९४१ 
बरे झालेले रुग्ण ः ५,२८३ 
उपचार घेत असलेले रुग्ण ः १,४६५ 
कोरोनामुळे मृत्यू ः १९३ 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

निफाड तालुक्यातील नागरिकांनी आता तरी सुज्ञपणा दाखवून आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करायला हवे. मास्क, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर पाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. 
-डॉ. चेतन काळे, नोडल अधिकारी, निफाड