केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी पाठोपाठ इथेनॉल निर्माणावर घातलेल्या बंदीवर शेतकरी नाराज असल्याचे हेरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशकात धाव घेऊन थेट आंदोलनात सहभाग घेतला. चांदवड येथील आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आपण या वयातही रस्त्यावर उतरू शकतो, याची प्रचिती त्यांनी दिली. तथापि, कांदा आंदोलनानिमित्त राजकीय साखर पेरणी करण्यात पवार यशस्वी झाल्याचे म्हणता येईल. स्थानिकांशी समरस होताना पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचेही लपून राहिले नाही.
सत्तेमध्ये असो अथवा नसो, सातत्याने प्रकाशझोतात राहणाऱ्या नेत्यांंमध्ये शरद पवार यांचा समावेश आहे. अलीकडील काळात स्वपक्षाची शकले होऊन स्वत:चा गट विकलांग झाला असला, तरी सत्ताधाऱ्यांवर येनकेन प्रकारे अंकुश ठेवण्याची पवारांची खासियत सर्वश्रुत आहे. विशेषत: शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्नांवर पवार केवळ भाष्य करून थांबत नाहीत, तर थेट संवाद साधून या घटकाला आपणच कसे त्यांचे तारणहार आहोत, हे दाखवण्यात पुरेपूर यशस्वी ठरतात. चांदवडस्थित आंदोलनातील सहभागातून पवारांनी सत्ताधाऱ्यांसह पक्ष सोडून गेलेल्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. दस्तुरखुद्द पवार सहभागी होणार म्हणून आंदोलनाकडे उभ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. नाशिक जिल्हा आणि कांदा उत्पादन या जणू एका नाण्याच्या दोन बाजू असल्याने शेतकऱ्यांची कड घेत पवारांनी केंद्र आणि राज्यातील शासनकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला. आंदोलनादरम्यान स्वत: कृषिमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी स्मरण करून दिलेच, शिवाय विद्यमान राज्यकर्ते शेतकऱ्यांची कशी हेळसांड करताहेत, हा मुद्दा त्यांनी उपस्थितांना पटवून दिला.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सहा आमदार खरे तर पवारांच्या एकसंघ पक्षाचे निवडून गेले आहेत. तथापि, सत्ताकारणाच्या अंकात सर्वांनी पवारांना अव्हेरून सत्तेतील अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. पवारांच्या संगतीत पदाधिकारीही मोजकेच राहिलेत. मात्र, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या सुरात सूर मिळवणे सत्तेमध्ये असलेल्या आमदार-पदाधिकारी यांना अशक्य असल्याने पवारांनी टायमिंग साधत आंदोलक बनून कधीकाळच्या स्वकीयांना एकप्रकारे इशारा दिला. नाशिक ते चांदवड या प्रवासात पवारांचे ठिकठिकाणी झालेले जोरदार स्वागतही स्वकीयांच्या चिंतेचा विषय बनावा. थोडक्यात, कांदा आंदोलनाच्या आडून शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकीय साखरपेरणी करण्यात यश मिळवले, असे म्हणण्यास पुरेपूर वाव आहे.
कदम, पिंगळे यांच्यासोबत विमानप्रवास.. (Sharad Pawar)
आपल्या नाशिक दौऱ्यात शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा घटक असलेल्या ठाकरे गटाला भेट देऊन राजकीय अंगाने चर्चा केली. नाशिक लोकसभा मतदारसंघ पवारांच्या अजेंड्यावर नसला, तरी दिंडोरी त्यांच्या पक्षाच्या वाटेला येणार हे निश्चित आहे. या मतदारसंघात पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यासोबतच त्यामध्ये मोडणाऱ्या येवला, निफाड, दिंडोरी, नांदगाव, चांदवड आणि कळवण या विधानसभा मतदारसंघांत कसे बदल घडवून आणता येतील, याचे आडाखे पवारांनी बांधले असल्यास नवल नाही. निफाडचे माजी आमदार अनिल कदम आणि नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे यांना सोबत घेऊन नाशिक-नागपूर विमानप्रवास घडवून पवारांनी आ. दिलीप बनकर व माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यावर कुरघोडी केल्याचेही बोलले जात आहे. पैकी गोकुळ पिंगळे यांच्या निवासस्थानी पवार यांनी दिलेली भेट नाशिक शहरातील चर्चेचा भाग ठरला.
हेही वाचा :
- मराठी आहे तोपर्यंत गदिमा, बाबूजी आपल्यात असतील : माजी राज्यपाल राम नाईक
- जहाजासमोर आला न्यूयॉर्कच्या तिप्पट मोठा हिमनग…
- IND vs ENG : भारताची दमदार कामगिरी
The post निमित्त कांदा आंदोलनाचे, ध्येय राजकीय पेरणीचे! appeared first on पुढारी.