निम्म्याने घटली शिष्यवृत्ती परीक्षार्थींची संख्या; शिक्षण विभाग सरसावला 

येवला (जि.नाशिक) : तब्बल ६६ वर्षांची दीर्घ परंपरा असलेल्या प्राथमिक (आता माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेकडे पालक-विद्यार्थ्यांकडून कानाडोळा होऊ लागला आहे. यामुळे काही वर्षात विद्यार्थी संख्या निम्म्याने घटली असून, आता शिक्षण विभागच याबाबत विचार करायला लागला आहे. याचमुळे यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रत्येक शाळेतील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सहभागी होतील, यासाठी उपाययोजना करण्यासाठी शिक्षण विभागाने पाऊल उचलले आहे. 

शिक्षण विभाग सरसावला; विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी जनजागृती 
प्रज्ञावंत, हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व शिक्षणासाठी अर्थसाह्य मिळावे या हेतूने राज्यात १९५४-५५ पासून चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. दर वर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होणारी ही परीक्षा यंदा कोरोनामुळे लांबली असून, ती २५ एप्रिलला घेण्याचे नियोजन आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप व परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी संयुक्त पत्रक काढून शिक्षणाधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक व शिक्षकांवर जबाबदारी सोपविली आहे. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

५० टक्के विद्यार्थी या परीक्षेत
२०१५पर्यंत चौथी व सातवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जायची. मात्र, त्यानंतर स्तर बदलत पाचवी व आठवीसाठी परीक्षा घेण्यात येते. त्यामुळेही विद्यार्थी संख्येतही मोठी घट झाली आहे. पूर्वी चौथी व सातवीचे वर्ग जिल्हा परिषद शाळांना जोडलेले असल्याने विद्यार्थीसंख्या अधिक असायची. मात्र, २०१७ पासून पाचवी व आठवीचे वर्ग माध्यमिक शाळांना जोडले गेले. तेव्हापासून विद्यार्थी व शिक्षकांमध्येही याबाबत माहितीचा अभाव असल्याने विद्यार्थी संख्येत घट झाल्याचा निष्कर्ष शिक्षण विभागाने काढला आहे. आता शिक्षणाधिकाऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक व शिक्षकांचे ऑनलाइन सभा घेऊन जनजागृती करावी तसेच, गटशिक्षणाधिकारी यांनीही तालुक्यातील मुख्याध्यापकांची ऑनलाइन सभा घेऊन व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून शाळेतील ५० टक्के विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होतील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ 

येथे करा अर्ज... 
या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३० मार्चपर्यंत आहे. त्यासाठी www.mscepuppss.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करायचे आहेत. 

शिष्यवृत्ती परीक्षेची अशी आहे विद्यार्थी संख्या 
वर्ष पूर्व माध्यमिक (चौथी) माध्यमिक (सातवी) एकूण 
२०१४ ८ लाख ९० हजार ६ लाख ७८ हजार १५ लाख ६० हजार 
२०१५ ९ लाख २७ हजार ६ लाख ६६ हजार १५ लाख ९४ हजार 
-- 
वर्ष पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) पूर्व माध्यमिक (८ वी) एकूण 
२०१७ ५ लाख ४५ हजार ४ लाख ३ हजार ९ लाख ४९ हजार 
२०१८ ४ लाख ८८ हजार ३ लाख ६९ हजार ८ लाख ५८ हजार 
२०१९ ५ लाख १२ हजार ३ लाख ५३ हजार ८ लाख ६६ हजार 
२०२० ५ लाख ७४ हजार ३ लाख ९७ हजार ९ लाख ७२ हजार