नियतीची खेळी! दिवाळीत मामाच्या गावची ती भेट शेवटचीच; भाच्याच्या नशिबी आले दुर्देव

भुसावळ (नाशिक) : मामाच्या घरी येण्यासाठी सकाळीच तयारी करुन बसला. वडिलांनी आईला अन् त्याला गावी आणून घातले अन् ते माघारी गेले. मामासोबत तो बाहेर गेला. अन् बस्सं सगळं काही संपलं. मामाच्या गावची शेवटची भेट, दिवाळी ही शेवटची. घटनेने कुटुंबाला हादराच...वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

कुऱ्हे (पाणाचे) (ता. भुसावळ) येथील सैन्यदलात वैद्यकीय विभागात नोकरीला असलेले दीपक लहानू पाटील हे पत्नी सोनाली व मुलगा कृष्णदीप यांना वाणेगाव येथे दुपारी तीनला मोटारसायकलवर सोडून घरी परत गेले. त्यांचा मुलगा कृष्णदीप काही वेळाने मामा संदीपसोबत लगेच लोहारी शिवारातील शेतात गेला. तेथे मोठे एक एकरचे शेततळे बघून तो पोहण्यासाठी गेला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुचकळ्या देऊ लागला. तळ्यात चाळीस फूट पाणी असल्याने मामा संदीपने तत्काळ उडी मारून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संदीपलाही पोहता येत नसल्याने कृष्णदीप पाण्यात बुडाला. त्यास तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. याबाबत पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पिंपळगाव हरेश्‍वर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

याबाबत पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पिंपळगाव हरेश्‍वर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. कृष्णदीप हा मनमिळाऊ व हुशार असल्याचे सांगण्यात आले. तो भुसावळ येथे डॉ. उल्हास पाटील न्यू इग्लिश मीडियम स्कूलमध्ये सातवीत शिकत होता. त्याच्यावर सोमवारी रात्री उशिरा कुऱ्हे पाणाचे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.