नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

सिन्नर (नाशिक) : परिस्थिती पुढे कोणाचं चालतं नाही हेच खरं. दुसऱ्याची शेती वाट्याने करणारी आई अन् मुलगा झोपडी करुन राहत होते. सकाळी चुलीवर जेवण बनवून आई मुलासाठी भाकरी घेऊन शेतात गेली. मात्र झोपडीकडं घडलं भलतंच...वाचा काय घडले नेमके?

अशी आहे घटना

सोमवारी (ता.३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास दापुर येथे शेतात घडली घटना. विठ्ठलवाडी मळा परिसरात बन्सी आव्हाड यांच्या शेतात कमल सोमनाथ उघडे या मुलासमवेत वाट्याने जमीन कसतात. हे दोघेही शेतातच झोपडी बांधून गेल्या चार वर्षांपासून वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी झोपडीपासून दोनशे फूट अंतरावर आई व मुलगा इतर मजुरांसमवेत शेतात काम करत असताना अचानक झोपडीतून धुराचे लोळ येऊ लागले. मजुरांनी झोपडीकडे धाव घेतली. मात्र, वीजप्रवाह खंडित असल्याने आग विझवता आली नाही. झोपडीतील धान्यसाठा, कपडे व इतर साहित्य आगीत बेचिराख झाली. दुचाकीचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. कमल उघडे यांनी सकाळचा स्वयंपाक केल्यावर चूल विझवून त्यावर तुराट्या ठेवल्या होत्या. कदाचित चूल पूर्ण विझली नाही व उष्णतेने धग लागून आगीचा भडका उडाला असा संशय व्यक्त होत आहे.

घटनेने मातेसह मुलाला हादराच बसला. रोजीरोटी करुन कसे तरी दिवस जात होते. त्यातच आता डोक्यावरील छप्पर देखील हिरावलं. बन्सी आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, दत्तात्रय आव्हाड, भगवान गारे यांनी उघडे कुटुंबियांची भेट घेऊन दिलासा दिला. घटनेचा पंचनामा करून पीडित कुटुंबाला भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.