नियतीने पुन्हा तिचे बाळ ‘तिच्या’ झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले

नाशिक : बाळाची आई रुग्णालयात येणाऱ्यांना फोटो दाखवत 'माझ्या मुलीला कोणी बघितले का', असे विचारत होती. आई-बाळाची भेट गेल्या तीन दिवसांपासून मुलीच्या विरहात ढसाढसा रडणाऱ्या मातेचे डोळे कोरडे पडले होते. माझे बाळ कोठे असेल? कोणी नेले? ती काय खात-पीत असेल? या विवंचनेने मातेचे मन सुन्न झाले होते. पण मंगळवारचा दिवस उजाडला आणि येणारी सकाळ तिच्यासाठी अत्यंत सुखदायी होती. कारण त्या प्रसंगाने मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले होते.

 मंगळवारचा दिवस उजाडला अन‌्...

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती कक्षाबाहेरून तीन दिवसांपूर्वी पळविलेली एक वर्षाची चिमुकली सापडली. मंगळवारी (ता.१६) पहाटे पोलिसांनी अपहरण करणाऱ्याला चिमुकलीसह ताब्यात घेतले. अपहरणकर्ता बाळाला घेऊन जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्याने जात होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला हटकले आणि अपहरणाचा छडा लागला. जिल्हा शासकीय रुग्णालयातून शनिवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील एका परप्रांतीय महिलेची एक वर्षाची चिमुकली येथील बाकावर झोपलेली होती.

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

संशयित माणिक सुरेश काळे (४८) याने आईची नजर चुकवून या चिमुकलीला उचलून पलायन केले होते. तीन दिवस काळे याने तिला आपल्या घरात ठेवले होते. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथक चिमुकलीसह आरोपीचा शोध घेत होते. विविध ठिकाणे पोलिसांनी पिंजून काढले होते. इतकेच नव्हे तर जिल्ह्याबाहेरसुद्धा पथके रवाना झाली होती. मात्र आरोपीचा कोठेही मागमूस लागत नव्हता. मुलीची आई रुग्णालयात येणाऱ्यांना फोटो दाखवत होती. लेकीच्या विवंचनेने मातेचे मन सुन्न झाले होते. मंगळवारचा दिवस उजाडला अन‌् नियतीने पुन्हा तिचे हरवलेले बाळ तिच्या झोळीत टाकले. 

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

अपहरणकर्त्याने यासाठी केले होते अपहरण
 दोन महिन्यांपूर्वी स्वत:च्या मुलीचा मृत्यु झाल्यामुळे या चिमुकलीचे अपहरण केल्याचे अपहरणकर्ता माणिक काळे याने पोलिसांना सांगितले. काळे याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या वर्तणुकीबद्दलची माहिती गोळा केली जात आहे.