नियतीने १५ दिवसांच्या लेकराच्या डोक्यावरून मातृछाया हिरावली! अखेर आजीच झाली आई…

जुनी शेमळी (जि.नाशिक) : नियतीने १५ दिवसांच्या बालकाच्या डोक्यावरून जन्मानंतर आईच्या मायेचे छत हिरावले. बाळाच्या आजीने या वयात घेतलेल्या निर्णयाचे तसेच धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

अखेर आजीच झाली आई...

किरातवाडी रस्त्याजवळ राहणाऱ्या आदिवासी महिला सीताबाई शिंदे (वय ५०) या कुटुंबाचा गाडा स्वतः चालवितात. घरातील परिस्थिती हलाखीची. दिवसभर मोलमजुरी केल्यानंतरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. पतीचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. सीताबाई यांच्या सूनबाईचे प्रसूतीच्या १५ दिवसांत निधन झाले. त्यामुळे त्यांच्या बाळाच्या पालनपोषणाची जबाबदारी आजीच्या खांद्यावर आली. मुलाला वरच्या दुधावर आजीने पालनपोषण सुरू केले. आपले काम सुरू असताना मुलगा बरोबर राहतो. शेतात काम करतानासुद्धा बरोबर घेऊन जावे लागते. बाळाचा जन्म झाल्यानंतर आई जशी शुश्रूषा करते तशीच शुश्रूषा आजी करीत आहे. बाळाचे नाव आजीने सागर ठेवले आहे.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

कोणालाही बालक न देण्याचा निर्णय

घरातील सर्व काम सांभाळून आजी बाळाला सांभाळते. बाळाला डॉक्टरांकडे नियमित औषधोपचारदेखील करते. या बाळाला ब्राह्मणगाव येथील सरकारी दवाखान्यातील परिचारिकांनी संगोपनाची जबाबदारी म्हणून बालकाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता; परंतु आजीने ‘माझ्या मुलाचा मुलगा आहे. तो मीच लहानाचा मोठा करेन’ हा निर्णय घेऊन कोणालाही बालक न देण्याचा निर्णय घेतला. आजीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO

धैर्याचे सर्वत्र कौतुक

पण बाळाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्या आजीने घेतली आहे. बाळाला आईची माया देऊन त्याचे पालनपोषण करण्याचा निर्धार आजीने केला आहे. आजीच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 

 

जन्म झाल्यानंतर पंधराव्या दिवशी त्याच्या आईचे निधन झाले. मी बाळाचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. बाळ कोणालाही दत्तक देणार नाही. बाळाला माझ्या जवळ मोठे करण्याचा माझा निर्धार आहे. मोठा झाल्यावर मी त्याला शाळेत शिकवीन. 
-सीताबाई शिंदे, जुनी शेमळी, आजी