नियुक्ती होऊनही हजर न होणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नोटिसा; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा  

नाशिक : गेल्या वर्षाच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग सहा ते आठ पटींनी अधिक असल्याने शहरातील महापालिकेसह खासगी रुग्णालये फुल झाली आहेत. रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन व व्हेन्टिलेटर बेडला अधिक मागणी आहे.अशात हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांना साथरोग नियंत्रण कायदा व आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत नोटीस बजावण्यात आली असून हजर न झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

नियुक्ती होऊनही हजर न होणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नोटिसा
शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून, सद्य: स्थितीत एक लाख ३२ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहे. यात बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग सहा ते आठ पटींनी अधिक असल्याने शहरातील महापालिकेसह खासगी रुग्णालये फुल झाली आहेत. रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन व व्हेन्टिलेटर बेडला अधिक मागणी आहे. महापालिकेच्या डॅश बोर्डवर बेड रिक्त असल्याचे दिसत असले तरी रुग्णालयाकडून फूल असल्याचे सांगितले जात असल्याने नातेवाइकांना मानसिक त्रास होत असल्याच्या तक्रारी आहे.

कायद्यांतर्गत नोटीस

कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभागाने तात्पुरत्या स्वरूपात विविध पदांसाठी भरती केल्यानंतर बिटको रुग्णालयात हजर न झालेल्या ३४६ कर्मचाऱ्यांना साथरोग नियंत्रण कायदा व आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत नोटीस बजावण्यात आली असून हजर न झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

अखेरीस कारवाईचे अस्त्र बाहेर

आर्थिक लूट हा आणखी एक गंभीर विषय आहे. त्यामुळे वैद्यकीय पथकाने सर्च ऑपरेशन मोहीम राबवत रुग्णालयांमधील बेडची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लेखा परिक्षकांची नियुक्ती करून रुग्णांना दिले जाणारे बिल तपासले जात आहे. दुसरीकडे मनुष्यबळ नसल्याच्या तक्रारीनुसार नव्याने तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर भरती केली आहे. परंतु, ज्या उमेदवारांना भरती करण्यात आले, आपत्कालीन परिस्थितीत ते देखील रुजू झाले नाहीत. त्यामुळे अखेरीस कारवाईचे अस्त्र बाहेर काढण्यात आले आहे. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

३४६ नियुक्त उमेदवारांवर होणार कारवाई 
एमडी मायक्रोबायोलॉजी २, भिषक ३, वैद्यकीय अधिकारी सहा, आयुष ४७, एमएससी मायक्रोबायोलॉजी १०, सी.टी. तंत्रज्ञ ४, स्टाफ नर्स ७१, एएनएम ९७, मिश्रक ७, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ९, वॉर्ड बॉय २७, समुपदेशक १०, डाटा एन्ट्री ऑपरेटर ४, मल्टी स्किल हेल्थ वर्कर ४४ असे एकूण ३४६ नियुक्त झालेल्या उमेदवारांवर कारवाई होणार आहे. 

 

कोविडच्या पार्श्वभूमीवर मानधनावर जाहिरात काढण्यात आली त्यावेळी उमेदवार स्वतःहून आले होते. त्यांची नियुक्ती शैक्षणिक अर्हतेनुसार करण्यात आली होती. मात्र नियुक्ती होवूनही आपत्कालीन परिस्थितीत हजर होत नसल्याने कारवाईच्या नोटिसा बजावण्याचा निर्णय घ्यावा लागला. 
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.