निर्बंधाबाबत नाशिककरांच्या मनात अद्यापही घोळच! दारु खरेदीसाठी लागल्या मोठ्या रांगा

नाशिक : राज्यात उद्या (ता. 6) पासून जिवणावश्यक सेवा वगळता सगळी दुकान बंद राहतील या घोषणेमुळे आज दिवसभर खरेदीसाठी झुंबड उडाली होती. अधिसुचनेत शनिवार ते रविवार पूर्ण बंद असाही उल्लेख असल्याने इतर दिवस दुकान सुरु राहणार का? याविषयी लोकांत संभ्रमावस्था होती. हेही गर्दीचे कारण होते. 

जिवणावश्यक वस्तूंशिवाय इतर दुकान बंद ठेवण्याचे आदेश असल्याने दुपारनंतर दारु, कपडे, स्टेशनरी, व इतर साहित्यांच्या खरेदी - विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. विशेषःत दारुच्या दुकानासमोर मोठ्या प्रमाणावर रांगा होत्या.  

 

नेमके काय असतील निर्बंध

राज्यात उद्यापासून जमावबंदीचा १४४ चा आदेश लागू होईल. कारखाने, जीवनावश्‍यक वस्तूंचे व्यवसाय सुरू राहतील. मात्र, शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, लसीकरण करणे बंधनकारक राहील.त्याचवेळी लसीकरण वाढवण्यावर भर दिला जाईल. ई-कॉमर्स सुरू राहील. सूक्ष्म कन्टेन्मेंट झोनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. समारंभ बंद राहणार असताना निवासी सोसायट्यांमध्ये फलक लावला जाईल. निर्बंध तोडल्यास सोसायट्यांना दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.  सार्वजनिक वाहतुकीसाठी पन्नास टक्के प्रवाशांचे बंधन राहील. त्याचवेळी चालक-वाहक, डिलिव्हरी बॉय, कामगार, कर्मचारी अशा लोकांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाने लसीकरण करून घेणे आवश्‍यक आहे. त्याचवेळी मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड केला जाईल. कार्यालयीन कामकाजात ‘वर्क फ्रॉम होम’वर भर दिला जावा. अत्यावश्‍यक आस्थापनांसह सरकारी कार्यालयांमध्ये पन्नास टक्के उपस्थिती ठेवणे आवश्‍यक असेल. मंत्रालयासह इतर ठिकाणी ‘व्हिजिटर' थांबवण्यात येतील.

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

ही आस्थापणे राहीतील बंद

मॉल, शाळा-महाविद्यालये बंद राहतील.  चित्रपटगृह, नाटक, वॉटरपार्क अशी गर्दीची ठिकाणे बंद राहतील. चित्रपटांचे चित्रीकरण सुरू राहील. मात्र मोठ्या गर्दीचे चित्रीकरण पुढे ढकलण्यास सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बार-हॉटेल, केश कर्तनालय बंद राहतील.

बंधनांसह सुरु असलेल्या सेवा

पार्सलला परवानगी राहील. मोठ्या हॉटेलमधील रेस्टॉरंट सुरू राहतील. बांधकामांसाठी आवश्‍यक कामगारांच्या निवासासह इतर योग्य सुविधा करत असताना लसीकरण करणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, शारीरिक अंतर राखणे महत्त्वाचे असेल, 

- जमाव होईल अशा सभा, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध राहतील.

- लग्नांसाठीचे निर्बंध तोडल्यास कडक कारवाई केली जाईल, उपस्थितांवरही कारवाई होईल.

 - पवित्र रमजान महिन्यात पाचपेक्षा कमी बांधवांना नमाजपठण करता येईल.

- पोलिसांच्या मदतीसाठी गृहरक्षक दलाच्या जवानांना सेवेत घेतले जाईल.

- ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधाच्या परिणामांचे अवलोकन करून पुढील धोरण स्वीकारले जाईल

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप