निर्बंध लागू असतानाचा फायदा; चक्क सायकलवरून दारूविक्रीचा धक्कादायक प्रकार

नाशिक : कोरोनामुळे निर्बंध लागू असताना याचा फायदा उचलत चक्‍क सायकलवरून मद्यविक्री सुरू असल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काय घडले नेमके?

कोरोनामुळे निर्बंध लागू असतानाचा फायदा

सायकलवरून मद्यविक्री करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. दिव्यमोहन सुनील राज (वय २१, श्रमिकनगर, सातपूर) व हेमंत ऊर्फ राहुल नितीन थोरात (२१, शिवाजीनगर) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित ध्रुवनगर बसथांब्‍याच्‍या परिसरात रात्री सायकलवरून विदेशी दारू नेताना आढळले. त्‍यांच्‍याकडे ४८ बाटल्‍यांचा साठा होता. साधारणतः तीन हजार रुपयांचा हा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला असून, दोघांविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

माळेगाव येथे देशी दारूची अवैध वाहतूक 

सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका बिअरबारला सील ठोकले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेली दारू या बारमधील असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. याबाबत उत्पादन शुल्क विभागाशी ग्रामस्थांनी संपर्क साधला आहे. त्यामुळे सांगळे याच्या कारमधील दारू नेमकी कुठून आली, ही माहिती उजेडात येऊ शकेल.  

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा

सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे स्विफ्ट कारमधून देशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिसांनी संशयित दत्तात्रेय शंकर सांगळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वाहनाची झडती घेण्यात आली. त्यात संत्रा देशी दारूच्या १४४ बाटल्या मिळाल्या. पोलिसांनी कारसह दारू ताब्यात घेतली. एकूण एक लाख ६९ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. या प्रकरणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.