निर्मलवारीचे ठरले; स्वच्छतागृहांसह पाणी टँकरची व्यवस्था

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी निर्मलवारीच्या माध्यमातून शासनाकडून प्राप्त निधीमधून खर्च करण्याचे नियोजन अखेर झाले आहे. यामध्ये पाचशे स्वच्छता गृह, २० लीटरचे ६ पाणी टँकर यांसह अनेक बाबींचा समावेश यामध्ये आहे. जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्षांसह विश्वस्तांची जिल्हा परिषदेमध्ये बैठक पार पडली.

यावेळी जिल्हा ग्रामिण विकास संस्थेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत वर्षा फडोळ, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ज्या गावांमधून पालखी प्रस्थान होणार आहे त्या सहा ग्रामपंचायीतांना प्रत्येकी ३ लाख रुपयांचे सहाय्य अनुदान तसेच सातपूर व पंचवटी या दोन ठिकाणच्या मुक्कामासाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली. पिण्याच्या पाण्यासाठी २० हजार लिटरचे सहा टँकर वारीच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत ठेवण्यात येणार आहेत. वारकऱ्यांच्या स्नानाची सोय करणे व वारी निघाल्यानंतर स्वछतेचे नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. पालखीसोबत जनरेटर व्हॅन पूर्ण वेळ सोबत असणार आहे. जि.प. आरोग्य विभागाच्या दोन रुग्णवाहीका तसेच खासदार राजाभाऊ वाजे यांची एक अशा तीन रुग्णवाहीका वारीसोबत असणार आहे.

यावेळी संत निवृत्तीनाथ ट्रस्टच्या अध्यक्ष कांचन जगताप, नारायण मुठाळ, राहुल साळुंखे, निलेश गाढवे, सोमनाथ घोटेकर आदींसह सहा गावातील सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार, सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा प्रशासनाने चांगल्या सुविधा दिल्या आहेत. आम्ही वारकरी मंडळी समाधानी आहोत. वेळोवेळी बैठका घेऊन प्रशासनाने चांगले नियोजन केले आहे. – कांचन जगताप, अध्यक्ष, निवृत्तीनाथ महाराज संस्थान.

हेही वाचा: