निर्यातदारांचा कांदा ‘तुतिकोरीन’कडे! श्रीलंका, मलेशिया, सिंगापूरमधून मागणी

नाशिक : मुंबईतील बंदरातून कांदा पाठविण्यासाठी कंटेनरची चणचण एकीकडे भासत असताना कंटेनरसाठी भाडे पाच ते सहापट मोजावे लागत आहे. त्यावर उपाय म्हणून निर्यातदारांनी कांदा तुतिकोरीनच्या बंदराकडे नेणे पसंत केले आहे. सद्यःस्थितीत श्रीलंका, मलेशिया, सिंगापूरमधून कांद्याची मागणी वाढली आहे.

मुंबईतील कंटेनरच्या चणचणीमुळे कांदा तुतिकोरीनकडे 

आर्थिक वर्षअखेरीच्या व्यवहाराच्या अनुषंगाने कांद्याच्या आगरातील बाजारपेठा अजूनही बंद आहेत. अशा परिस्थितीत दिल्ली अन् मुंबईत क्विंटलभर कांद्यासाठी सरासरी साडेबाराशे रुपये भाव मिळत आहे. 
श्रीलंकेसाठी ३२० ते ३३० डॉलर, मलेशियासाठी २८० डॉलर, सिंगापूरसाठी ३३० डॉलर असा भाव कांद्याला टनाला मिळत आहे. कर्नाटकमधून २० टन कांदा तुतिकोरीनला ट्रकने नेण्यासाठी २० हजारांचे भाडे मोजावे लागते. नाशिकहून ८० हजारांचे भाडे निर्यातदारांना मोजावे लागते.

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

श्रीलंका, मलेशिया, सिंगापूरमधून मागणी; दिल्ली अन् मुंबईत साडेबाराशेचा भाव 

कर्नाटकमधून सप्टेंबरमध्ये कांद्याची आवक वाढणार आहे. त्या वेळी नाशिकच्या कांद्याला मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. तोपर्यंत तुतिकोरीनच्या बंदरातून कांद्याच्या निर्यातीवर निर्यातदारांनी लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. त्यामागे मुंबईच्या तुलनेत कमी कालावधीत कंटेनर परदेशात पोचते हेही एक कारण आहे. मुंबईतून श्रीलंकेत कंटेनर पोचण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागतो. तुतिकोरीनहून कांदा मात्र श्रीलंकेत काही तासांमध्ये पोचतो. त्याचप्रमाणे मलेशिया आणि सिंगापूरसाठी तुतिकोरीनहून तीन दिवस अगोदर कांदा जातो. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

भाड्यासाठी मोठी रक्कम 
कांद्याला ३० टनांच्या कंटेनरसाठी पूर्वी टनाला २० ते २५ डॉलर भाडे द्यावे लागायचे. आता हेच भाडे १०० डॉलरपर्यंत पोचले आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आता सरकारला कंटेनरच्या उपलब्धतेकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्यातून निर्यातदारांसाठी आवाक्यात भाडे येण्यास मदत होणार आहे. परिणामी, पाकिस्तानच्या कांद्याशी स्पर्धा करून पाकिस्तानचा जगातील बाजारपेठेतील हिस्सा २० टक्क्यांवरून आणखी कमी करणे शक्य होईल, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, दिल्लीतील आझादपूर मंडईत कांद्याला क्विंटलला सरासरी एक हजार २४२ रुपयांनी विकला गेला. मुंबईत गुरुवारी साडेबाराशे रुपयांचा भाव मिळाला. चोवीस तासांपूर्वी हाच भाव बाराशे रुपये इतका होता. पुण्यात मात्र स्थानिक कांद्याच्या भावात क्विंटलला ५० रुपयांची वाढ होऊन ९०० रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांद्याची विक्री झाली. लोणंदच्या उन्हाळ कांद्याला एक हजार ७५ रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला. बेंगळुरूमध्ये २४ तासांत स्थानिक आणि महाराष्ट्रातील कांद्याच्या भावात क्विंटलला ५० रुपयांची घसरण होऊन इथे गुरुवारी स्थानिक कांदा ८५०, तर महाराष्ट्राचा कांदा बाराशे रुपये क्विंटल या सरासरी भावाने विकला गेला. लखनौमध्ये चौदाशे, तर प्रयागराजमध्ये सोळाशे रुपये क्विंटल असा सरासरी भाव राहिला. 

कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

० लासलगाव ः लाल ९०१, उन्हाळ ९५० 
० नाशिक ः उन्हाळ- ९५०