निवडणुकांसाठी इच्छुक सक्रिय! सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोचण्याचा आटापिटा

नाशिक रोड : फेब्रुवारी- २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दसरा-दिवाळीबरोबरच नेत्यांच्या, थोरपुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथी यांच्यानिमित्त सोशल मीडियावर इच्छुक ॲक्टिव्ह झाले आहेत. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत यशापयश पत्करलेल्या व इच्छुकांनी सोशल मीडियावर आपले अस्तित्व वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

नगरसेवकांचा विकासकामांचा धडाका

प्रभागनिहाय नागरिकांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करणे त्यांना नियमितपणे शुभेच्छा देणे, नवीन सक्रिय कार्यकर्ते तयार करण्याची कामे सुरू केली आहेत. निवडणुकीसाठी १४ महिने बाकी असताना विद्यमान नगरसेवकांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. गुड मॉर्निंग, गुड नाईट, थोरपुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी, पक्षाचा अजेंडा, आंदोलने, मोर्चे नागरिकांच्या वैयक्तिक समस्या या माध्यमातून इच्छुक लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही परिसरात सामान्य नागरिकांचे वाढदिवसही मोठ्या धूमधडाक्यात नेतेमंडळी साजरी करताना दिसत आहे.

इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपचा इच्छुकांचा वापर

निवडणुका फेब्रुवारी-२०२२ मध्ये होणार असल्या तरी एकेका प्रभागात २० हजारांच्या आसपास मतदार असल्याने सर्वांपर्यंत ऐनवेळी पोचताना दमछाक होते. त्यामुळे प्रभागरचना जाहीर होण्यापूर्वीच तयारी करावी लागते. शहरात सध्या प्रत्येक प्रभागात अशाच पद्धतीने तयारीला सुरवात झाली आहे. सहा महिन्यांत हे चित्र अधिकाधिक वाढत जाणार आहे. इच्छुक उमेदवार प्रभागाच्या चारही दिशांना जनसंपर्क वाढवताना दिसत आहे, तर काहींनी दुसऱ्या पक्षात जाण्याचीही तयारी केली असून, त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक तयारीचा भाग म्हणून विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे उंबरठेही काही इच्छुक झिजवत आहेत. फेसबुक पेज विकत घेण्याबरोबरच इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपचा इच्छुकांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.