निवडणुकीत उमेदवारांचा हायटेक प्रचार; सोशल मीडियामुळे गावाची निवडणूक वाटतेय ग्लोबल

इगतपुरी (नाशिक) : ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीमुळे उमेदवारांनी पारंपरिक प्रचाराबरोबर हायटेक प्रचार जोरात सुरू आहे. यात सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर सुरू आहे. गावातील निवडणुकांसाठी व्हॉट्सॲप महत्त्वाचे प्रचार साधन बनले आहे. 

निवडणुक येणार रंगात

इगतपुरी तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या १५ जानेवारीला होत आहेत. निवडणुकांचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे. तसतसा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत रंगत वाढत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही त्याच गावापुरतीच अवलंबून असते. मात्र आता सोशल मीडियामार्फत व्हॉट्सॲप, फेसबुकमुळे गावपातळीवर प्रचार न राहता संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात पोचत आहे. त्यामुळे उमेदवारांकडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर सुरू आहे. एका गावापुरता हा प्रचार मर्यादित राहिलेलाच नाही. 

सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याचे काम सुरू

सोमवारी निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे सोमवारपासूनच उमेदवारांनी हायटेक प्रचाराला सुरवात केली. सोशल मीडियाच्या व्हॅट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर फोटो, व्हिडिओ क्लिप, तसेच उमेदवारांनी पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे आणि प्रचाराच्या पोस्ट टाकण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, उमेदवारांनी वैयक्तिक व प्रभागातील उमेदवारांचे एकत्र डिझाइन तयार करत असून, सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

पारावर नव्हे, सोशल मीडियावर गप्पा
 
ग्रामपंचायत निवडणुका आल्या म्हणजे गावातील पारावरच्या चर्चा आणि चहांच्या टपऱ्यांवर चर्चांना उधाण यायचे. मात्र, यंदा लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत रंगत आहे. गावपातळीवरील तंटे, लोकांमधील नाराजी, नाराजी दूर करण्यचे प्रयत्न, घरोघर रंगणारे रुसवेफुगवे याचीही जाहीर चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागली आहे.  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा