निसाकाबाबत सकारात्मक कार्यवाही करणार – अजित पवार

निफाड (नाशिक) : निफाड सहकारी साखर कारखाना व रानवड साखर कारखाना चालू गळीत हंगामात कार्यान्वित करण्याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून सकारात्मक कारवाई करण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडचे उपोषणकर्ते खंडू बोडके यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिले.

खंडू बोडकेंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्‍वासन

चालू गळीत हंगामात निफाड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके यांनी मंत्रालयातील अजित पवार यांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केल्यानंतर आंदोलनावर ठाम असलेल्या खंडू बोडके यांच्या उपोषणाची दखल अजित पवार यांनी घेत त्यांची माजी आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत भेट घेतली. या वेळी बोडके यांनी अजित पवार यांच्या समोर विधानसभा निवडणुकीत आपण दोन्ही कारखाने कार्यान्वित करण्याचे दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्यानंतर पवार यांनी कारखाना सुरू करण्याच्या मागण्यांवर चर्चा केली.

घातले राजकारणविरहित साकडे

अजित पवार यांनी निफाड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना रास्त असल्याचे नमूद करून कोरोना संकटामुळे त्याबाबत विलंब होत असल्याचे स्पष्ट केले. कारखाने भाडेतत्त्वावर देण्याच्या समितीचे अध्यक्षपद आपण सोडले असले तरी समितीचे अध्यक्ष असलेले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करू. आपण निफाडकरांना दिलेला शब्द ज्ञात असून, निसाका-रासाकाबाबत तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन या वेळी दिले. माजी आमदार अनिल कदम यांनीही शिष्टमंडळासमवेत कारखाने कार्यान्वित करण्यासाठी राजकारणविरहित साकडे घातले.

या वेळी निफाड पंचायत समिती सभापती शंकर संगमनेरे, सदस्य शहाजी राजोळे, संदीप टरले, देवेंद्र काजळे, समीर जोशी, बाळासाहेब पावशे, दत्तू भुसारे, सागर जाधव, नंदू राजोळे, राजेंद्र राजोळे, नितीन निकम, योगेश बोराडे, नंदू निरभवणे, आप्पा राजोळे, अनिल जोगदंड, बाळासाहेब कानडे, रमजू तांबोळी, नितीन मोगल, रामा शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निसाका-रासाकाबाबत सविस्तर चर्चा केली. मात्र कोरोनाचे कारण देत निसाकाबाबत ठोस आश्वासन न दिल्याने आपले समाधान झाले नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निसाका-रासाकाचा संघर्ष सुरूच ठेवणार आहे. - खंडू बोडके