‘नीट’ परीक्षा घोटाळ्यातील बाधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा : आ. तांबे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नीट परीक्षा प्रकरणामुळे देशाच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. केंद्र सरकारने या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि घोटाळ्याने बाधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी शासनाकडे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पालकांनी नीट परीक्षेबद्दल तक्रार करत आहेत. अनेक पालकांकडे या परीक्षेच्या गोंधळाचे पुरावेही आहेत. सामान्य परिवारातील लाखो मुलांनी मेडिकलमध्ये करिअर करायचे स्वप्न पाहिलेले असते. ते या देशाचे भविष्यातले डॉक्टर होणार आहेत. परंतु अशा परीक्षांच्या घोटाळ्यामुळे मुलांचे स्वप्न भंग होत आहे. त्यामुळे नीट परीक्षेतील बाधित विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आ. तांबेनी केंद्र सरकारकडे केली आहे.

परीक्षेत ग्रेस मार्कांचा घोटाळा, सेंटर विकत घेणे, पेपर फुटी आणि एकाच सीरियल नंबरचे सात पेक्षा जास्त मुले टॉपर झाले आहेत. याआधी नीट परीक्षेत तीन पेक्षा जास्त अव्वल विद्यार्थी आलेले नाहीत. म्हणजेच हा एक मोठा घोटाळा आहे असेही आ.तांबे यांनी शेवटी नमूद केले.

नीट परीक्षेतील गैरप्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की करणारा, देशाच्या विश्वासार्हतेला तडा देणारा आहे. केंद्र सरकारने तातडीने जागे व्हावे, या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी व या घोटाळ्याने बाधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही माझी आग्रही मागणी आहे. – सत्यजीत तांबे, आमदार.

हेही वाचा: