नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा – आमदार दिलीप बोरसे

सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान घातले असून, तब्बल १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांची हानी झाली आहे. साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळ कांदा पीक उद्ध्वस्त होऊन साठ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. 

तालुक्यात रविवारपासून गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. तीन दिवसात तब्बल ६७ गावांना फटका बसला आहे. त्यामध्ये केरसाणे, दसाणे, तळवाडे दिगर, पठावे दिगर, मोरकुरे, भिलदर, किकवारी, मुंगसे, पिंगळवाडे, करंजाड, ताहाराबाद, लाडूद, निताणे, पारणेर, बिजोटे, आखतवाडे, आसखेडा, आनंदपूर, आसखेडा, वाघळे, उत्राणे, श्रीपूरवडे, वडे, ब्राह्मणपाडे, जायखेडा, सोमपूर, तांदुळवाडी, भडाणे, पिंपळकोठे, दरेगाव, अंतापूर, मूल्हेर, जामोटी, शेवरे, दसवेल, तुंगण, माळीवाडा, हरणबारी, आजन्दे, बोरदैवत, अलियाबाद, जाड, गोळवाड, बाभुळणे, वाघांबे, साकोडे, डांगसौंदणे, जोरण आदी परिसराला सलग तीन दिवस गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपले. यात बागलाणचे कांदा हे मुख्य पीक भुईसपाट झाले आहे. शेतकर्यांनी महागडे बियाणे खरेदी करून कांदा पीक घेतले होते. हेक्टरी ८० ते ९० हजार रुपये खर्च करून उभे केलेले पीक क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

भाजीपाला भुईसपाट 

तालुक्यातील कान्हेरी, करंजाडी, मोसम खोर्यात टोमॅटो, मिरची, टरबूज, काकडी, घेवडा आदी भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ही पिके गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई येथे विक्रीसाठी पाठविली जातात. जोमात असलेले भाजीपाला पीक गारपिटीने भुईसपाट होऊन शेतकरी आर्थिक आडचणीत सापडला आहे. 

भरीव मदतीची मागणी 

आमदार दिलीप बोरसे यांनी ठिकठिकाणी भेट घेऊन बाधित पिकांची पाहणी केली. या नैसर्गिक आपत्तीने साडेसहा हजार शेतकर्यांना फटका बसला आहे. बाधित पिकांचे लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना संबधित यंत्रणेला दिल्या. त्याचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याबाबत माहिती आपण संबंधित मंत्र्यांना पत्राद्वारे कळविली असून, भरीव मदतीची मागणी केली आहे. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ