नेचर क्लबच्या सर्वेक्षणात नाशिकमध्ये १२० गिधाडांची नोंद! वन विभागाच्या प्रयत्नांना यश

नाशिक : नाशिकमध्ये गिधाडांची संख्या वाढत असून, नेचर क्लबच्या दोन महिन्यांच्या सर्वेक्षणात १२० गिधाडांची नोंद झाली आहे. त्यात हरसूल परिसरात ३६, त्र्यंबकेश्‍वर आणि घोटी परिसरातील ३२, पेठमधील २८, सुरगाण्यातील १२, बागलाणमधील १६, तर अंकाई भागातील चार गिधाडांचा समावेश आहे. 

वन विभागाच्या प्रयत्नांना यश; ‘ट्रान्झिट सेंटर’ मंजुरीची प्रतीक्षा 
देशात दहा वर्षांपूर्वी गिधाडे मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. वन विभाग आणि काही पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संस्थांनी दिलेल्या योगदानामुळे गिधाडांची संख्या वाढत आहे. तसेच वल्चर रेस्टॉरंटची मदत झाली आहे. आता नाशिकमध्ये ‘ट्रान्झिट सेंटर’ मंजुरीची प्रतीक्षा आहे. नाशिकमध्ये पक्षी, वन्यप्राणी जखमी झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुणे अथवा मुंबईला न्यावे लागते. त्या मुळे अनेक वन्यप्राणी आणि पक्षी दगावण्याची शक्यता असते. गिधाडसारखे सूची एकमधील पक्षी जखमी झाल्यावर त्यांच्यावर उपचारासाठी ‘ट्रान्झिट सेंटर’ आवश्यक आहे. मंत्रालयात अडकलेल्या फाइलमुळे त्याची प्रतीक्षा कधी संपणार, हा खरा प्रश्‍न आहे. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

निसर्गातील सफाई कामगार’
कासव व कावळा यांच्याप्रमाणे गिधाड हा पक्षीसुद्धा ‘निसर्गातील सफाई कामगार’ म्हणून ओळखला जातो. आपल्याकडे प्रामुख्याने दोन प्रकारची गिधाडे आढळतात. ओरिएंटल व्हाइट बॅक अर्थात पांढऱ्या पाठीची आणि दुसरी ‘इंडियन’ अथवा ‘लाँगबिल्ड’ अर्थात, लांब चोचीची गिधाडे. पांढऱ्या पाठीची गिधाडे झाडांवर, तर लांब चोचीची गिधाडे उंच डोंगरकड्यांवर खोबणीत आपली घरटी करतात. 

हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

आदिवासी भागात गिधाडांचे प्रमाण अधिक

अंजनेरी, हरिहर, वाघेरा, ब्रह्मगिरी, भास्करगड आदी परिसरात गिधाडांचे वास्तव्य पाहायला मिळते. सालबारीच्या रांगेतील अजिंठा-सातमाळा उपरांगेतील कळवण तालुक्यातील समुद्रसपाटीपासून चार हजार २९ फूट उंच असलेला अहिवंत किल्ल्यावर गिधाडांची दोन घरटी व चार पक्षी दिसून आले. तसेच पेठ, हरसूल, सुरगाणा, घोटी, इगतपुरी या आदिवासी भागात गिधाडांचे प्रमाण अधिक आढळले. पिसे नसलेले केसरहित डोके हे बहुतांश गिधाडांचे वैशिष्ट्य आहे. सर्व गिधाडे मुख्यत्वे उंच आकाशात विहार करत असतात. साधारणपणे कळपात एकमेकांपासून अंतर ठेवून विहार करणे पसंत करतात. भिन्नभिन्न जातींची गिधाडे एकत्र विहार करतात. 

‘टेलिमिटरी‘ प्रस्ताव व्हावा मंजूर 
वन विभागाने आता ‘टेलिमिटरी’द्वारे अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव नागपूरच्या कार्यालयाकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव मंजूर व्हावा, अशी नेचर क्लब ऑफ नाशिकची मागणी आहे.