Site icon

नेदरलँडला १६० टन द्राक्ष निर्यात; नाशिक जिल्ह्यातून श्रीगणेशा

लासलगाव; पुढारी वृत्तसेवा : निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला सुरुवात झाली असून 12 कंटेनरमधून 160 मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीनं जगाला भुरळ घालणार्‍या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून निर्यातीचा पहिला कंटेनर रवाना झाला आहे.

द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन 2021-22 हंगामात तब्बल 2 लाख 63 हजार 75 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून 2302 कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. नाशिकमध्ये यंदा द्राक्ष पिकाला पोषक वातावरण होते. त्यामुळे 37 हजार 465 द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली. भारतीय शेतमाल आणि फळबागेला बांगलादेश येथे मोठी मागणी आहे. केंद्र सरकारने बांगलादेशमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी विशेष लक्ष देऊन वाहतूक खर्च आणि ड्युटी कमी केली तर द्राक्ष निर्यातीस वाव मिळेल याचबरोबर केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठी नवनवीन बाजारपेठ शोधून आपल्याकडील शेतमाल जास्तीत जास्त कसा निर्यात होईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

गुणवत्ता वाढली तरी द्राक्षाच्या देशांतर्गत बाजारातील तसेच निर्यातीच्या बाजारातील असुरक्षितता मात्र कायमच आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात आल्याने मातीमोल भावाने द्राक्ष विक्री करण्याची वेळ उत्पादकांवर आली होती. सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादन खर्च आणि मजूरटंचाई या अडथळ्यांवर मात करीत जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावतच ठेवली आहे.

या देशात होते निर्यात

पोषक हवामानामुळे यंदा निर्यातक्षम, दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे. जानेवारीपासून द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. नाशिकची द्राक्षे युरोपीय देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, जर्मनी, मलेशिया, बांगलादेश आदी देशांत पाठविण्यात येतात.

अधिक वाचा :

The post नेदरलँडला १६० टन द्राक्ष निर्यात; नाशिक जिल्ह्यातून श्रीगणेशा appeared first on पुढारी.

Exit mobile version