नेपाळला नाशिकच्या द्राक्षांची गोडी! यंदा द्राक्षांना मिळाली नवी बाजारपेठ

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : कोरोनामुळे परदेशी बाजारपेठत घटलेली मागणी, कंटेनरच्या अनुदानावर केंद्र शासनाची फुली, कंटेनरची भाडेवाढ यामुळे द्राक्षाचे दर कधी नव्हे, एवढे ते तब्बल २५ रुपयांनी घसरले आहेत. दराची पडझड अजूनही होऊन शकली असती; पण नेपाळमध्ये रोज ७५ टन द्राक्ष दोन महिन्यांपासून पोचत आहेत. नेपाळच्या नागरिकांना नाशिकच्या द्राक्षांची गोडी लागल्याने यंदा द्राक्षांना नवी बाजारपेठ मिळाली आहे. 

यंदा द्राक्षांना मिळाली नवी बाजारपेठ 
फेब्रुवारी, मार्च म्हटला, की युरोप, रशियासह परदेशात इतर ठिकाणी नाशिकची द्राक्षे पाठविण्याची लगबग असते. कोरोनामुळे काही देशात लॉकडाउन, तर केंद्र शासनाच्या धोरणामुळे निर्यातीचा टक्का यंदा घसरला आहे. सुमारे दहा टक्के निर्यात घटून जेमतेम सात हजार कंटेनर परदेशात पोचू शकतील. देशांतर्गत स्थितीही यंदा द्राक्षांना फारशी पूरक नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेसाठी व्यापाऱ्यांकडून २० ते २५ रुपये किलो द्राक्ष खरेदी केली जात आहेत. उत्पादन खर्चही निघतो की नाही, अशी स्थिती आहे. 

हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

नेपाळच्या बाजारपेठेत बोलबाला 
नाशिकमधून यापूर्वी द्राक्ष निर्यात होत होती. पण अगदीच नगण्य प्रमाण असायचे. मातोश्री व्हेजिटेबलचे संचालक सोमनाथ निमसे यांनी नेपाळच्या व्यापाऱ्यांशी करार केला. जानेवारीपासून द्राक्ष पाठविण्यास सुरवात झाली. नेपाळमधील काठमांडू, विराटनगर, जनकपूर, विरंगण, पोखरा, नारायणघाट आदी शहरात नाशिकमधून रोज १५ टनाचे पाच ट्रक पोचत आहेत. भैरवा, वीरंगज, भिकटभोर या सीमा ओलांडून नाशिकच्या द्राक्षांचा नेपाळमध्ये बोलबाला आहे. काळी, सफेद रंगाच्या थॉमसन वाणाची द्राक्षाला मोठी मागणी आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत साडेचार हजार टन द्राक्षे पोचली आहेत. द्राक्षविक्रीतून सुमारे बारा कोटी रुपये नेपाळमधून परकी चलन भारतात आले आहे. आणखी दोन हजार टन द्राक्ष हंगामाच्या सांगतेपर्यंत नेपाळमध्ये पोचतील, असा अंदाज व्यापारी हेमंतसिंग यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

 

द्राक्ष हंगामाला यंदा दराबाबत प्रतिकूल स्थिती आहे. दराची घट अजूनही वाढली असती, पण नेपाळ ही नवी बाजारपेठ यंदा नाशिकच्या द्राक्षांना मिळू शकली. दर टिकून ठेवण्यात नेपाळच्या बाजारपेठेची महत्त्वाची भूमिका आहे. 
- सोमनाथ निमसे, मातोश्री व्हेजिटेबल