नोकरभरती प्रकरणी वॉटरग्रेसला क्लीन चिट; आरोग्य विभागाचा आयुक्तांना अहवाल 

नाशिक : शहरातील पूर्व व पश्‍चिम विभागात स्वच्छतेसाठी नेमलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या ठेकेदाराने सफाई कर्मचारी भरती करताना अनामत रक्कम घेण्यासह कर्मचाऱ्यांना अनियमित वेतन दिले जात असल्याच्या आरोपावरून आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीत अनियमितता आढळली नसल्याचा अहवाल आयुक्तांना सादर करताना क्लीन चिट दिली आहे. 

काय आहे नेमके प्रकरण?

महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने शहरातील पूर्व व पश्‍चिम विभागात स्वच्छतेसाठी खासगीकरणातून स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मे. वॉटरग्रेस कंपनीला स्वच्छतेचे काम देण्यात आले होते. चार महिन्यांपूर्वी स्वच्छता कर्मचारी नियुक्त करताना १५ ते २० हजार रुपये अनामत रक्कम म्हणून इच्छुक उमेदवारांकडून घेण्यात आल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या. स्वच्छतेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नसल्याचे तसेच सफाई कर्मचाऱ्यांचे एटीएम कार्ड ठेकेदाराकडे असल्याने एटीएममधून ठराविक रक्कम काढून घेतली जात असल्याचा आरोप होत होता. 
जळगाव येथे सुनील झंवर यांच्या कार्यालयावर पुणे येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने टाकलेल्या छाप्यात एटीएम कार्ड आढळल्याने ते नाशिकमधील असल्याचा संशय व्यक्त होत होता. भाजपचे नगरसेवक कमलेश बोडके यांनी त्या अनुषंगाने मागील स्थायी समितीच्या बैठकीत तक्रारींची शहानिशा करण्याची मागणी केली होती. आयुक्त कैलास जाधव यांनी आरोग्य विभागाला तशा सूचना दिल्या होत्या. आरोग्य विभागाच्या डॉ. कल्पना कुटे यांनी चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केल्याची माहिती शुक्रवारी स्थायी समितीला दिली. 

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न

आरोपांमध्ये तथ्य नाही

तक्रारींच्या अनुषंगाने पश्‍चिम, पूर्व व रामकुंड भागात २५ सफाई कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. चुकीच्या पद्धतीने हजेरी दाखविली जाते का? एटीएममधून ठेकेदारांच्या माणसांकडून पैसे काढले जातात का? अनामत रक्कम संबंधित ठेकेदाराने घेतली का? यावर चौकशी झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती असल्याचे उत्तर दिले तर १५ हजार ५०० रुपये वेतन मिळत असल्याचेही सांगण्यात आल्याचे डॉ. कुटे यांनी सांगितले. 

आता स्थायीवर मांडा 

दरम्यान, आरोग्य विभागाने महापालिका आयुक्तांकडे सादर केलेल्या अहवालाची सविस्तर माहिती देण्यात आल्यानंतर आता हा क्लीन चिट अहवाल स्थायी समितीवर सादर करण्याच्या सूचना सभापती गणेश गिते यांनी दिल्या.  

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO