न्यायालयाच्या आवारातच सराईत गुन्हेगारांनी मागितली खंडणी; परिसरात खळबळ

नाशिक : खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या संशयिताकडे दोघा सराईत गुन्हेगारांनी न्यायालयाच्या आवारात खंडणी मागितल्याने खळबळ उडाली आहे.

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडूनच खंडणी

जयेश हिरामण दिवे (३८, रा. पेठ फाटा) व अरुण गायकवाड (४०, रा. कोळीवाडा, हिरावाडी) अशी खंडणी मागणाऱ्या संशयितांची नावे असून, ते पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. याप्रकरणी पवन शिवाजी कातकाडे (३३, रा. इंदिरानगर) याने तक्रार दाखल केली आहे.याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सुनावणीसाठी समोरासमोर आल्यानंतर घडला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आणि तक्रारदार हे पंचवटीतील एका खुनाच्या गुन्ह्यातील सहआरोपी आहेत. बुधवारी (ता.१७) अतिरिक्त सत्र न्यायालयात तक्रारदार व संशयितांची तारीख होती. दुपारच्या सुमारास तिघे न्यायालयात सुनावणीसाठी समोरासमोर आल्यानंतर तक्रारदार पवन कातकाडे हा रोहित उघडे याच्यासमवेत बसलेला असताना संशयित दिवे व गायकवाड यांनी त्यास गाठले. या वेळी संशयितांनी त्याला ठार करण्याची धमकी देत ५० हजारांच्या खंडणीची मागणी केली. यामुळे पवन कातकाडे याने सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार केली.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

दहाहून अधिक गुन्हे दाखल

पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा संशयितांना अटक केली. न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. संशयित जयेश दिवे याच्याविरोधात तीन खून, मारहाण, जबरी चोरी, दरोडा, ठार मारण्याचा प्रयत्न असे दहाहून अधिक गुन्हे दाखल आहेत. तर अरुण गायकवाड याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. दिवे सराईत गुन्हेगार असून, पोलिसांनी त्याच्यासह टोळीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईही केली होती. उपनिरीक्षक संदीप पवार अधिक तपास करीत आहेत.  

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा