पंकजा मुंडे यांच्या भावनांचा पक्षश्रेष्ठी विचार करतील : रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे:www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंकजा मुंडे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या भावनांचा नक्कीच विचार केला जाईल, अशा स्वरूपाचा आशावाद केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त करत लवकरच मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आजादी का अमृतमहोत्सवांतर्गत भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला दानवे यांनी शुक्रवारी (दि.12) भेट दिली. यानंतर भाजपच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस-शिंदे गटाच्या राज्य मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने मुंडे यांनी कदाचित मंत्रिपदासाठी माझी पात्रता नसेल, अशा शब्दांत भावना व्यक्त करत नाराजी प्रकट केली होती. यामुळे राज्य मंत्रिमंडळाबाबत भाजपमधील अंतर्गत वाद समोर आला असून, यासंदर्भात ना. दानवे यांना विचारले असता, ‘मुंडे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असून, त्यांच्या भावनांचा पक्षाचे वरिष्ठ नेते विचार करतील, अशी मोजकीच प्रतिक्रिया व्यक्त केली. याप्रसंगी आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, अ‍ॅड. राहुल ढिकले, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, विजय साने, प्रशांत जाधव, सुनील केदार, उध्दव निमसे, अमित घुगे, प्रशांत माने, अ‍ॅड. अजिंक्य साने, निखिल पवार आदी उपस्थित होते.

क्रांतिकारकांबद्दल जागृतीचे काम देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. मात्र, आजही अनेक क्रांतिकारकांची नावे लोकांना माहीत नाहीत. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त अशा क्रांतिकारकांचा शोध घेऊन त्यांच्याबद्दल जागृती करण्याचे काम केले जात आहे. देशाला मिळालेले स्वातंत्र्य आणि फाळणी याबाबतचा इतिहास नवीन पिढीला माहिती व्हावा, यासाठी देखील भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती यावेळी ना. दानवे यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासाठी जे जे करणे शक्य असेल ते करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

नाशिकच्या प्रश्नांवर मौन
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे आणि कल्याण-इगतपुरी मेमू रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत दानवे यांना विचारले असता या दोन्ही प्रश्नांवर त्यांनी माहिती घेतो, असे मोघम उत्तर देत अधिक बोलणे टाळले. ‘वंदे भारत’ या नावाने सुरू करण्यात येणार्‍या काही रेल्वेचे येत्या काळात उद्घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

The post पंकजा मुंडे यांच्या भावनांचा पक्षश्रेष्ठी विचार करतील : रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.