‘पंचवटी’ उघडणार का भाजपच्या सत्तेची कवाडे? अदलाबदलीच्या समीकरणाने वाढणार रंगत 

पंचवटी ( नाशिक) : वर्षाभरावर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विद्यमान सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्या मुळे लाटेवर स्वार होणाऱ्या या शहरात आगामी निवडणुकीचा कल कुणाकडे असणार, याबाबत उत्सुकता आहे. अशा स्थितीत तब्बल चोवीस नगरसेवक असलेल्या पंचवटी विभागातून या वेळीही भाजपसाठी सत्तेची कवाडे उघडणार का, यावर महापालिकेच्या आगामी राजकारणाची दिशा ठरण्याची शक्यता आहे. 

पंचवटी विभागात चोवीस नगरसेवक

महापालिकेच्या स्थापनेपासून आजवर झालेल्या सहाही निवडणुकांत पंचवटी विभागातून सर्वच पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे. मात्र, विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत मनसेने शहरासह नाशिक पूर्वची विधानसभाही जिंकली. मात्र, त्यानंतर झालेल्या दोन्ही निवडणुकांत भाजपने बाजी मारली. पंचवटी विभागात चोवीस नगरसेवक असून, त्यापैकी तब्बल १९ भाजपचे आहेत. मात्र, पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने पंचवटी विभागात कोणाच्या पारड्यात अधिक जागा टाकतो, त्यावर महापालिकेतील सत्तेची गणिते अवलंबून आहेत. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

शिवसेनेची ‘अबकी बार सौ पार’ची घोषणा

२०१४ ला झालेल्या निवडणुकीत बाळासाहेब सानप यांनी बाजी मारत विरोधकांना चितपट करत नाशिक पूर्वची आमदारकी मिळविली होती. त्यानंतर २०१७ ला झालेल्या महापालिका निवडणुकीत चोवीसपैकी तब्बल १९ नगरसेवक एकट्या पंचवटी विभागातून निवडून आणण्याची किमया केल्याचे त्यांचे पक्षातील वजनही वाढले होते. त्या मुळे आमदार, पक्षाचे शहराध्यक्षपदीही त्यांचीच निवड झाली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपने तिकीट कापल्याने सानप यांनी राष्टवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली; परंतु त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. आता सानप यांची पुन्हा घरवापसी झालेली असली तरी परिस्थिती बदललेली आहे. सुनील बागूल यांच्यासारख्या वजनदार नेत्याने पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्याने अर्थातच शिवसैनिकही जोमात आहेत. अर्थात मागील दोन पंचवार्षिकमध्ये पंचवटी विभागात शिवसेनेला महिला सदस्याच्या रूपात केवळ एकच जागा मिळाली होती. शिवसेनेची या वर्षी ‘अबकी बार सौ पार’ची घोषणा असल्याने जागा वाढविण्याचे दडपण अर्थातच बागूलसह अन्य नेत्यांवर राहणार आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा
 

अनेकांचे तळ्यात-मळ्यात 

नगरसेविका शांता हिरे यांचे निधन झाल्याने सद्या विभागात भाजपचे अठरा नगरसेवक आहेत. भाजप लाटेवर स्वार होत अनेक पक्षांतून भाजपात आलेल्या काही नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. त्या मुळे विद्यमान १८ पैकी भाजप किती जणांना पुन्हा संधी देतो, तसेच वारा पाहून किती नगरसेवक अन्य पक्षांची वाट धरतात, यावरही बहुमताचे गणित अवलंबून आहे.