पंचायत समितीत साडीविक्रेता उधारी मागतो तेव्हा..!

सिडको (नाशिक) : थांबा, गोंधळून जाऊ नका. हे एखाद्या साडी अथवा कपड्याचे मार्केट नव्हे तर, हे आहे नाशिक पंचायत समितीचे कार्यालय. असेच काहीसे सांगण्याची वेळ येथे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना एका प्रकारातून बघायला मिळत होती. सध्या नाशिक पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ‘महिलाराज’ असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे ही बाब खरोखर आशादायक म्हटल्यास वावगे ठरणार नाही; परंतु जेथे महिला एकत्र येतात तेथे काही गोष्टी अनवधानाने येणार हे सहाजिकच आहे. असाच काहीसा प्रकार सध्या त्र्यंबक रोडवरील नाशिक पंचायत समितीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना बघायला मिळत होता. 

पण हटकण्याची हिंमत कोण करणार...

नाशिक पंचायत समिती सभापती व गटविकास अधिकारी या दोघीही महिला आहेत. त्याच बरोबरीला प्रत्येक विभागात महिला कर्मचाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात दिसून येते. बुधवारी (ता. २०) दुपारी जेवणाची सुटी होण्यापूर्वी दर महिन्याला येथे साडीविक्री करणारा बाबा तुम्हाला नेहमी बघायला मिळेल. बुधवारीही तो महिलांच्या चॉइसच्या साड्या घेऊन आला होता. सामान्य प्रशासन विभागातील एक महिला कर्मचारी कार्यालयीन कामकाज सोडून साड्यांची निवडानिवड करीत होती. हा प्रकार उपस्थित सर्व कर्मचारी व आलेल्या नागरिकांना बघायला मिळत होता, तर काही जण विनोदही करताना दिसत होते; परंतु एकाही अधिकारी वा कर्मचाऱ्याची त्यांना हटकण्याची हिंमत झाली नाही. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

येणाऱ्या-जाणाऱ्यामध्ये कमालीची खमंग चर्चा

विशेष म्हणजे वरच्या मजल्यावर ग्रामसेवक व सरपंच यांची कार्यशाळा सुरू होती. या कार्यशाळेला महिला गटविकास अधिकारी व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. खाली मात्र साड्या विक्री सर्रास सुरू होती. साडीवाले बाबा प्रत्येक विभागात एक-एक चक्कर मारताना दिसत होते. त्यांपैकी महिला गटविकास अधिकाऱ्यांच्या महिला शिपायाकडे त्यांची उधारी बाकी होती. त्यामुळे ते उधारीचे पैसे मिळावेत म्हणून विनवणी करताना दिसले. हा प्रकार बघून येणाऱ्या-जाणाऱ्यामध्ये मात्र कमालीची खमंग चर्चा सुरू होती आणि ती म्हणजे ‘हे साडी मार्केट आहे की पंचायत समितीचे कार्यालय?’  

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार