पंधरा मिनिटांत टोचली ‘इतकी’ इंजेक्शनं? आकडा बघताच फुटले बिंग; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

नाशिक : जिल्हा रुग्णालयात विनाउपचार इंजेक्शन गहाळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या रुग्णावर कुठलेही उपचार न करता एकाच वेळी थेट पाच इंजेक्शन टोचल्याचे दाखवत इंजेक्शन गायब झाल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. वाचा नेमके काय घडले? 

असा आहे प्रकार

मारहाणीत जखमी रुग्णाला जळीत वॉर्डात रात्रभर दाखल करून शनिवारी (ता.१६) जेव्हा घरी सोडण्यात आले. तेव्हा डिस्चार्ज कार्डावर थेट पाच इंजेक्शने दिल्याचे पाहून दस्तुरखुद्द जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडेही चकित झाल्या. घडल्या प्रकाराबाबत त्यांनी रुग्णाची तक्रार ऐकून आणि खरोखरच इंजेक्शन दिले का, याची खात्री करून घेत त्वरित चौकशी सुरू केली आहे. संबंधितांना नोटीस बजावून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वडाळागावातील टोळक्याच्या मारहाणीत एक जखमी तरुण शुक्रवारी (ता.१५) रात्री रुग्णालयात दाखल झाला होता. जागेअभावी त्याची रवानगी जळीत वॉर्डात करण्यात आली. अ‍ॅडमिट कागदपत्राच्या आधारे त्याच्यावर उपचारही झाले नाहीत. शनिवारी सकाळी शिफ्टनुसार नव्याने सेवा बजावण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या हातात डिस्चार्ज कार्ड ठेवल्यानंतर धक्काच बसला. 

आपबिती ऐकवल्यावर बिंग फुटले...

वैद्यकीय तपासणीनंतर सलाईन अथवा कुठलाही उपचार केलेला नसताना डिस्चार्ज कार्डावर मात्र पाच इंजेक्शन दिल्याची नोंद होती. उपचार न करता औषधोपचार केल्याचे आढळल्याने त्याने थेट जिल्हा शल्यचिकित्सक रावखंडे यांची कॅबिन गाठून आपबिती ऐकवल्यावर बिंग फुटले. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

मागविला लेखी अहवाल

डॉ. रावखंडे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यास बोलावून औषधोपचाराबाबत माहिती घेतली. भांडारगृहातील नोंदी तपासल्या असता पाच इंजेक्शनं संबंधित रुग्णास टोचण्यासाठी नेण्यात आल्याचे समोर आले. खातरजमा करण्यासाठी रुग्णांची अंगतपासणीही करण्यात आली. त्यात रुग्णावर रात्रभर कुठलाही उपचार करण्यात आला नसल्याचे वास्तव समोर आल्याने डॉ. रावखंडे यांनी संबंधितांना नोटिसा बजावत लेखी अहवाल मागविले.

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच