पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना मिळाला ‘बाबाजीचा ठुल्लू’ : आदित्य ठाकरेंचा घणाघात

आदित्य ठाकरे

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. यात जळगावातील शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाशी गद्दारी करून शिंदे गटात सहभागी झाले. जे गद्दार तिकडे गेले त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मंत्री करू, त्यांनाही वाटलं चांगली खाती मिळतील. पण, त्यांना मिळालं काय? बाबाजी का ठुल्लू ? असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पार पडली. या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वैशाली सूर्यवंशी यांनी आदित्य ठाकरे यांना औक्षण करत राखी बांधली. यावेळी व्यासपीठावर वैशाली सुर्यवंशी, नरेंदसिंग सुर्यवंशी, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, युवा सेना सचिव सूरज चव्हाण, लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महिला संघटिका जिल्हाप्रमुख अंजली नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाध्यक्ष रावेर दीपकसिंग राजपूत यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी ५० थरांची दहीहंडी फोडली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात म्हणाले, ५० थरांची दहीहंडी फोडली. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, दहीहंडी कालच होऊन गेली आहे. कालच महाराष्ट्राच्या तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, त्यांनी पण ५० थर लावले होते. मात्र त्यांनी ५० थरांची दहीहंडी फोडली की इतर काही घेतले. ५० खोके यांनी घेतले मलाई यांनी खाल्ली मात्र सामान्य जनतेला काय मिळालं तर काहीच नाही, असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांना असं वाटत असेल की शिवसेनेसोबत कोणी नाही. त्यात त्यांनी आता या ठिकाणी यावे आणि ही गर्दी पहावी की आजही किती लोक शिवसेनेसोबत आहेत. हे तुमचं प्रेम तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद घ्यायलाच मी आलो आहे, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

३३ देशांनी गद्दारीची नोंद घेतली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते, ३३ देशांनी आमच्या बंडाची नोंद घेतली आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले आहे. ३३ देशांनी तुमच्या गद्दारीची नोंद घेतली आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर राजीनामे देऊन निवडणुकांना सामोरे जा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले. सरकार गेल्याचं दुःख आम्हाला नाही. ते परत आणाल. पण महाराष्ट्राच्या प्रगतीचं काम यांनी रोखलं.

कोविड काळात जनतेचे जीव वाचवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. जगानेही याचं कौतुक केलं. पण महाराष्ट्र पुढे गेला तर काय होईल, यामुळे त्यांच्या पोटात दुखत असेल. देशात आपलं नाव होत होतं, तेच त्यांच्या पोटात दुखत होतं, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीका केली.

हेही वाचा

तंटामुक्त समिती पदाधिका-यांसमोरच पती-पत्नीवर हल्ला; पतीचा मृत्यू  

Kanhaiya Kumar : नितीन गडकरींविरोधातच सीबीआयचा वापर होऊ शकतो : कन्हैय्या कुमार

Cuttputlli Trailer : सीरियल किलरच्या शोधात अक्षय कुमार! सस्पेंसने भरलेला ‘कठपुतली’चा ट्रेलर पहा

The post पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना मिळाला 'बाबाजीचा ठुल्लू' : आदित्य ठाकरेंचा घणाघात appeared first on पुढारी.