पतीसोबत पत्नीचा एका छताखाली खाल्लेला तो शेवटचा घास! नियतीचा घात आणि परिसरात हळहळ

सुरगाणा (जि.नाशिक) : पती- पत्नी दोघेही त्या दिवशी जेवण करत होते. पण त्यांनाही नाही माहित कि अचानक अशी काही दुर्घटना घडेल आणि सर्वच उध्वस्त होईल. असे काय घडले?

एक दुर्घटना आणि सर्वच उध्वस्त; पिंपळसोंड येथील घटना

पोलिसपाटील रतन खोटरे यांनी सांगितले, की गुरुवारी (ता. ११) दीड ते दोनच्या सुमारास राहीबाई व तिचे पती सोमा गावित घरात जेवण करत असताना अचानक इंदिरा आवास योजनेच्या घरकुलाचे कौलारू छप्पर बाटम, लाकडी जाड वासे, तसेच सागवान लाकडाच्या वजनदार वळ्या 
डोक्यावर कोसळल्याने राहीबाईंचा जागीच मृत्यू झाला. पतीला गंभीर दुखापत झाली. याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य सोन्या बागूल यांनी सांगितले, की पाच ते सात वर्षांपूर्वी लाभार्थी महिलेस इंदिरा आवास योजनेचे घरकुल मिळाले होते. घरकुलाचा पहिला हप्ता लाभार्थी महिलेस मिळाला. मात्र पुढील हप्ते अद्यापही मिळालेच नाहीत. 

पूर्ण घरच ढासळून जमीनदोस्त
आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने घरकुलाचे बांधकाम पूर्ण करता आले नाही. दुसरे घर नसल्याने अपूर्ण असलेल्या घरातच नाइलाजाने राहावे लागत होते. घरकुलाच्या जोत्यावर (पायावर) पैशाअभावी वीट बांधकाम न करता आल्याने अलगदपणे ठेवलेले खांब कोसळल्याने पूर्ण घरच ढासळून जमीनदोस्त झाले. यातच लाभार्थ्याचा दबून मृत्यू झाला. घरकुलाचे लाभार्थ्यास हप्ते मिळावेत, या मागणीसाठी आदिवासी दलित पँथरचे जिल्हा उपाध्यक्ष तुळशीराम खोटरे यांनी अनेक वेळा धरणे आंदोलन, उपोषण केले व निवेदने दिली आहेत. मात्र अद्यापही घरकुलाचे लाभार्थी वंचितच आहेत. 
या आकस्मिक मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. पिंपळसोंड हा भाग गुजरात सीमेलगत असून, अतिदुर्गम आहे. महिलेचे नातेवाईक मजुरीकरिता बाहेरगावी गेले होते. ते आल्यावर रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

इंदिरा आवास योजनेचे घरकुल अंगावर कोसळून घरातच लाभार्थ्याचा मृत्यू झाला, ही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत पंचनामा करण्याचे आदेश तलाठी एम. के. गायकवाड यांना दिले आहेत. 
-किशोर मराठे, तहसीलदार 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

उपचारासाठी रुग्णालयात दाखल

तालुक्यातील बारागाव डांग विभागातील ग्रामपंचायत गोंदुणेंतर्गत पिंपळसोंड येथे इंदिरा आवास योजनेच्या घरकुलाचे छप्पर अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत राहीबाई सोमा गावित (वय ५३) या महिलेचा घरातच मृत्यू झाला. तिचे पती सोमा गावित (वय ५८) गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.