Site icon

पदवीधरचा रणसंग्राम : मतदानासाठी प्रशासनाची तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक पदवीधर निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हा मुद्दा विरोधकांनी सत्ताधारी विरुद्ध प्रतिष्ठेचा केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही मतदानाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 30 तारखेला मतदान होणार आहेे. जिल्ह्यातील सुमारे 67 हजार पदवीधर मतदार हे त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यादृष्टीने मतदान केंद्र, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तसेच मतपेट्या आणि मतदान साहित्याची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. जिल्हाभरात 99 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यंदाची पदवीधरची निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरणार आहे. भाजप व काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार रिंगणात नसल्यामुळे खरी लढत ही अपक्षांमध्येच होणार आहे. तब्बल 22 उमेदवार रिंगणात असून, सोमवारी (दि. 16) माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र खर्‍या अर्थाने स्पष्ट होईल. दरम्यान, पदवीधरसाठीचे मतदान हे पसंती क्रमांकानुसार होणार आहे. त्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचार्‍यांचे पहिले प्रशिक्षण नुकतेच पार पडले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या प्रशिक्षणात कर्मचार्‍यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. दरम्यान, दुसरे प्रशिक्षण शिबिर हे 23 तारखेला आयोजित करण्यात आले आहे.

मतमोजणीचीही तयारी…
पदवीधरसाठी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत 30 जानेवारीला मतदान घेण्यात येणार आहे. मात्र, पाचही जिल्ह्यांतील मतमोजणीची प्रक्रिया ही नाशिकमध्ये पार पडणार आहे. सय्यद पिंप्री येथील निवडणूक शाखेच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतीच गोदामाची पाहणी करून मतमोजणीच्या दृष्टीने प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

हेही वाचा:

The post पदवीधरचा रणसंग्राम : मतदानासाठी प्रशासनाची तयारी appeared first on पुढारी.

Exit mobile version