पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची खास रणनीती, मुंबईहून खास टीम नाशिकमध्ये दाखल

बैठक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अत्यंत प्रतिष्ठेची केली असून, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी मुंबईहून शिवसेनेचे खास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पथक दाखल झाले आहे.

मुंबईचे आमदार विलास पोतनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शालिमार कार्यालयात झालेल्या बैठकीत खास रणनीती आखण्यात आली. यावेळी उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, आमदार नरेंद्र दराडे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी तसेच मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी विनायक सामंत, पांडुरंग देसाई, आमोद गुप्ते आदी उपस्थित होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शुभांगी पाटील यांना पुरस्कृत केले आहे. धनशक्तीच्या जोरावर निवडणूक लढविणार्‍या प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांना पुरस्कृत करणार्‍या पक्षांचे धाबे दणाणल्याची टीका बैठकीत आमदार पोतनीस यांनी केली. मविआ पुरस्कृत उमेदवारासाठी शिवसेनेच्या विविध टीम आणि कार्यकर्ते मतदारसंघाच्या कानाकोपर्‍यात रवाना झाले आहेत. मुंबई तसेच अन्य भागांतील कार्यकर्तेही मतदारसंघात दाखल झाले आहेत. मतदारयाद्यांचे वाटप करण्यात आले असून, आता विविध कार्यालये तसेच शाळा,मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला जात आहे.

हेही वाचा:

The post पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची खास रणनीती, मुंबईहून खास टीम नाशिकमध्ये दाखल appeared first on पुढारी.