पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक

नाशिक पदवीधर मतदारसंघ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक पदवीधर मतदारसंघात अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक असताना नगरमधून राजेंद्र विखे-पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे विजयाचे दावे करणार्‍या भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असून, पक्षाचे संकटमोचक ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची ऐनवेळी उमेदवाराचा शोध घेण्यावरून दमछाक होत आहे.

पदवीधर मतदारसंघाची रणधुमाळी रंगायला सुरुवात झाली असून, विभागीय आयुक्तालयात सद्या नामनिर्देशन अर्जाची प्रक्रिया राबविली जात आहे. निवडणुकीसाठी झालेली अर्जविक्री बघता यंदा इच्छुकांची भाऊगर्दी आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार सुधीर तांबे हेच रिंगणात उतरणार हे स्पष्ट असले तरी प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपचा उमेदवार अद्यापही ठरलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वास्तविक पदवीधरसाठी भाजपमध्ये इच्छुकांची रांग आहे. मात्र, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील यांचा चेहरा निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार म्हणून पुढे आला. त्याचे मुख्यत्वे कारण म्हणजे विखे-पाटीलांनी सहा महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करतानाच मतदार नोंदणीमध्येही सिंहाचा वाटा उचलला. परिणामी पक्षातील अन्य इच्छुकांनी जवळपास पॅकअप केले. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत अर्ज दाखल करायला अवघ्या 72 तासांचा कालावधी शिल्लक राहिला असताना विखे-पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. परिणामी वेळेवर उमेदवार कोण द्यायचा यावरून आता भाजप अंतर्गत खल सुरू असून, पक्षाचे निवडणूक प्रमुख ना. महाजनांकडून सर्वच शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. मात्र, असे असले तरी विखे-पाटील यांनी निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेण्यावरून विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

उद्या हाेणार उमेदवाराचा फैसला
विखे-पाटील यांच्या माघारीमुळे भाजपपुढे उमेदवार देण्यावरून पेच निर्माण झाला आहे. पक्षाकडून सोमवारी (दि.9) कोकण शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली. परंतु, नाशिकचा पदवीधरचा पेच कायम असल्याने बुधवारी (दि.11) संध्याकाळ पर्यंत पक्षाकडून उमेदवार घोषित केला जाऊ शकतो.

हेही वाचा:

The post पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक appeared first on पुढारी.