नाशिक : कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील २०१३ पॅटर्नच्या, तसेच बी. एस्सी. ॲनिमेशन (२०१६ पॅटर्न), एलएलबी (२०१७ पॅटर्न) या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने कोरोनामुळे निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतल्या जातील. येत्या ८ ते २० डिसेंबरदरम्यान या परीक्षा होणार असून, १० जानेवारी २०२१ पर्यंत निकाल जाहीर केला जाईल.
परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम एम. ई. (इलेक्टिव्ह) सर्व वर्षांच्या परीक्षादेखील या कालावधीत होतील. परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुणे विद्यापीठाने सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार अनुशेषित विषयांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ८ ते २० डिसेंबरदरम्यान महाविद्यालय स्तरावर करण्याच्या सूचना केल्या आहेत. निकालाची प्रक्रिया १० जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण करून निकालाची सॉफ्ट कॉपी व मूळ पत्र परीक्षा विभागास सादर करायचे आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन जसे शक्य होईल त्या माध्यमातून ही परीक्षा घ्यायची आहे. एक तासाच्या या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार असून, पन्नास गुणांसाठी ही परीक्षा होईल. परीक्षेत साठ बहुपर्यायी प्रश्नांपैकी ५० प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरावीत.
हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली
परीक्षांच्या आयोजनापूर्वी किंवा परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी महाविद्यालय, संस्थेमध्ये विद्यार्थी सहाय्यता कक्ष तयार करावे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सविस्तर सूचना व दिशानिर्देशाचे पत्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या नावे पाठविले आहे.
हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार