पदवी, पदव्‍युत्तर पदवीच्‍या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; सीईटी सेलचा निर्णय

नाशिक : विविध अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्‍यानंतर प्रत्‍यक्ष प्रवेश निश्‍चितीसाठी कॅप राउंडची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक असते. पदवी व पदव्‍युत्तर पदवी शिक्षणक्रमाच्‍या प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे. 

बहुतांश अभ्यासक्रमाच्‍या ऑनलाइन अर्जाची मुदत येत्‍या एक-दोन दिवसांत संपणार होती. त्‍यातच मुदतवाढीचा निर्णय सीईटी सेलने घेतल्‍याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांपैकी अभियांत्रिकी शाखेच्‍या बी.ई., बी.टेक. अभ्यासक्रमासाठी सुधारीत वेळापत्रकानुसार २२ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील बी.फार्मसी, फार्म.डी. अभ्यासक्रमासाठी २१ डिसेंबरपर्यंत मुदत असेल. आर्किटेक्‍चर अभ्यासक्रम बी.आर्क.साठी २० डिसेंबर, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरींग टेक्‍नॉलॉजीकरीता २३ डिसेंबर, डीएसईकरीता २१ डिसेंबर, डीएसपीकरीता २१ डिसेंबरपर्यंत मुदत असेल. दरम्‍यान ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ दिल्‍याने यापूर्वी जाहीर केलेल्‍या कॅप राउंडच्‍या प्रक्रियेत बदल होण्याची शक्‍यता आहे. त्‍यानुसार सुधारीत वेळापत्रक येत्‍या दोन-तीन दिवसांमध्ये जारी केले जाणार असल्‍याचे सीईटी सेलमार्फत स्‍पष्ट केले आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

पदव्‍युत्तर पदवीसाठीची मुदतवाढ अशी 

एमबीए अभ्यासक्रमासाठी २० डिसेंबर, अभियांत्रिकी शाखेच्‍या पदव्‍युत्तर पदवी एमई. एम.टेक. करीता २४ डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे. तर २३ डिसेंबरपर्यंत एमसीए, औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील एम.फार्मसी.फार्म.डी., आणि आर्किटेक्‍चर शाखेच्‍या एम.आर्क.च्‍या प्रवेशासाठी पात्र इच्‍छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविता येणार आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ