पन्नास टक्के उमेदवारांकडून निवडणुक खर्च सादर नाहीच! पदावर गंडातर येण्याची शक्यता

पन्नास टक्के उमेदवारांनी सादर केला नाही निवडणुक खर्च   

पन्नास टक्के उमेदवारांनी सादर केला नाही उमेदवारी खर्च 

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च ऑफलाइनसोबत ऑनलाइन सादर करण्याची परवानगी निवडणूक विभागाने उमेदवारांना दिली असली तरी निफाड तालुक्यात आतापर्यंत सुमारे ५० टक्के उमेदवारांनी खर्चच सादर केला नाही. विजयी उमेदवारांनी खर्च साद केलेला असला तरी पराभूत उमेदवारांनी खर्च सादर करण्याकडे पाठ फिरविली आहे. निवडून आलेल्यांसह पराभूत उमेदवारांना १७ फेब्रुवारीपर्यंत खर्च सादर न केल्यास पदावर गंडातर येऊ शकते. शिवाय पुढील निवडणूक लढण्यावरही निर्बंध येणार आहेत. 

खर्च सादर न केल्यास पदावर गंडातर
निफाड तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींसाठी ६३७ जागांसाठी एक हजार ७२५ उमेदवार रिंगणात होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५० टक्के उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर करण्याकडे पाठ फिरविली आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी मर्यादेपेक्षा अधिक खर्च करू नये, यासाठी खर्चाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन खर्च सादर करण्याची सुविधा निवडणूक विभागाने उपलब्ध करून दिली आहे. परंतु हा खर्च ऑनलाइन सादर करताना अडचणी येत आहे. इतकेच नव्हे, तर अनेकांना ऑनलाइन खर्च सादर करावा लागतो, याची माहितीच नाही. त्यामुळे बहुतांश उमेदवार प्रत्यक्ष कागदपत्र सादर करीत आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीतील विजयी उमेदवारांबरोबरच बिनविरोध, पराभूत व माघार घेतलेल्या उमेदवारांनाही खर्च सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी वेळेच्या आत खर्च सादर करावा, असे आवाहन तहसीलदार शरद घोरपडे यांनी केले आहे. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

पराभूत उमेदवारांची पाठ 
निवडणुकीसाठी उभे असलेल्या प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीचा खर्च सादर करणे बंधनकारक आहे. परंतु निवडून आलेले उमेदवारच निवडणूक खर्च सादर करीत आहेत. पराभूत उमेदवार त्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. खर्चही सादर करण्याकडे टाळाटाळ करीत आहेत. नियमानुसार पराभूत उमेदवारांनी खर्च सादर न केल्यास पुढची निवडणूक लढण्यास प्रतिबंध घातला जातो. या नियमाबाबत उमेदवारांमध्ये जागृती नसल्याने पराभूत उमेदवार खर्च सादर करीत नसल्याची बाब समोर येत आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

उमेदवारांनी खर्च सादर करणे, ही बाब गांभीऱ्याने घ्यायला हवी. खर्च सादर न केल्यास विजयी उमेदवारांच्या पदावर गंडातर येऊ शकते. तर पराभूत उमेदवाराला पुढील निवडणूक लढताना अडसर येईल. -एन. वाय. उगले, मंडळ अधिकारी, पिंपळगाव बसवंत