परतीच्या थंडीने द्राक्षपंढरी धास्तावली! निफाडचा पारा सहा अंशावर 

निफाड (जि. नाशिक) : उत्तरेतून येणाऱ्या शितलहरींमुळे जिल्ह्यात थंडी परतली आहे. रविवारी (ता.७) पारा ७.२ अंशावर होता. तर, सोमवारी (ता.८) तापमानात घसरण होऊन पारा थेट ६ अंशावर येऊन स्थिरावला. द्राक्ष परिपक्व होण्याच्या मार्गावर असतानाच थंडीत वाढ झाल्याने मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे. 

पुन्हा शेतकरी चिंतेत

नाशिक जिल्ह्यातील ५८ हजार हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू आहे. अशातच पुन्हा एकदा थंडीने दस्तक दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. डिसेंबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर परिस्थिती सुधारेल, असे वाटत असतांनाच गायब झालेली थंडी परतल्याने अडचणीत भर पडली आहे. या थंडीमुळे परीपक्व द्राक्ष बागांवर परिणाम जाणवू लागला आहे. निर्यातक्षम द्राक्षांच्या प्रतवारीवर थेट परिणाम होऊ लागला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आणि बर्फवृष्टीमुळे द्राक्ष मालाला उठाव नाही. व्यापारी हंगाम सुरु झाला तरी पाहिजे त्या प्रमाणात द्राक्ष दिसत नसल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

मागील वर्षीचा पूर्ण हंगाम कोरोना महामारीमध्ये उद्धवस्त झाला. यंदा चांगले उत्पादन दृष्टीपथात असताना बदलते वातावरण द्राक्षांना घातक ठरत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेली थंडी परिपक्व द्राक्षांच्या मुळावर उठली आहे. या थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे. निर्यातक्षम द्राक्षबागांच्या प्रतवारीवर त्याचा परिणाम होणार आहे. 
- प्रमोद पगार, द्राक्ष उत्पादक, कळवण 

दोन-तीन वर्षांपासून बदलत्या वातावरणाचा फटका आमच्या द्राक्षबागांना बसत आहे. कर्ज काढून द्राक्षबागा उभारायच्या आणि अस्मानी - सुलतानी संकटात सापडण्याचे चक्र सुरू झाले आहे. आधीच नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या द्राक्षबागा आणि त्यात जिल्हा बँकेने पाठवलेल्या नोटिसा यामुळे आम्ही हबकून गेलो आहे. 
- दत्तू सुडके, द्राक्ष उत्पादक, उगाव 

- जिल्ह्यातील द्राक्षाचे क्षेत्र 
५८ हजार ३६७ हेक्टर 

- एकूण उत्पादन दृष्टीपथात 
१६८८५९२.५४ 

- द्राक्ष शेतीत काम करणारे मजूर 
अडिच लाखाहून अधिक. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच