परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करा; द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी 

दिंडोरी (जि.नाशिक) : द्राक्ष उत्पादकांना गंडा घालणाऱ्या परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करावे, अशी मागणी तालुक्यातील तसेच परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. 

तालुक्यातील अंबानेर, माळेदुमाला, निळवंडी, पाडे, खेडगाव, दुधखेड, पारेगाव, चिखलआंबे, कोशिंबे, वणी, जानोरी, मोहाडी, चिंचखेड परिसरातील, तसेच दिंडोरी व चांदवड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. मडकीजांब येथील चार शेतकऱ्यांना फसवून व्यापारी पळून गेला. थोडा तोटा आला की व्यापारी पळून जातात. काही हेतुपुरस्सर पळून जातात. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना शेवटच्या टप्प्यात दोन पैसे शेतकऱ्यांच्या हातात मिळणे महत्त्वाचे असते. आगामी काळात खबरदारीचा उपाय म्हणून अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून ओळखपत्र घेणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

सध्या निर्यातदारांनी संघटना केल्याने निर्यातक्षम द्राक्षे कमी भावात घेणे पूर्णपणे चुकीचे आहे. थंडीमुळे वेलीची पाने गळाली. त्यामुळे अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबली. त्यामुळे द्राक्षे कमजोर पडण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. निर्यातक्षम द्राक्षांना ४० ते ५० रुपये भाव मिळत असल्याने स्थानिक दर ३० ते ३५ रुपयांप्रमाणे खाली आले आहेत. त्यात २ टक्के वाफसी (कापला) करतात. व्यापारी शंभर ते पाचशे रुपये इसार देऊन संपूर्ण द्राक्षे घेऊन जातात. आठ ते दहा दिवसांनंतर हिशेब करण्यासाठी पेढीवर बोलवितात. त्यातही विविध कारणाने शेतकऱ्यांचे पैसे कमी करतात. 
या व्यापाऱ्यांना कृषी विभाग व पोलिस ठाण्यातर्फे संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बॅंकेचे पासबुक, शिधापत्रिका असल्याशिवाय ओळखपत्र देऊ नये, प्रत्येक व्यापाऱ्याला ओळखपत्र बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी रमेश देशमुख, सतीश बर्डे, योगेश दवंगे, माधव गाडगीळ, सतीश जंगम, योगेश डोखळे, एकनाथ संधान, वसंत देशमुख आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO