परस्पर ‘एचआरसीटी’ करण्यास मनाई; बेडचा तुटवडा निर्माण 

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बेड फुल झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यापार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये खरोखर बेड शिल्लक आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी थेट रुग्णालयांमध्ये जाऊन सर्च ऑपरेशन मोहीम राबविली जात आहे.

परस्पर एचआरसीटी करण्यास मनाई 

असे असताना आता परस्पर एचआरसीटी करून स्कोर अधिक आल्यास उपचार केले जात असल्याची बाब समोर आल्याने यातून देखील बेडचा तुटवडा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी परस्पर एचआरसीटी करण्यास मनाई केली आहे. एचआरसीटी करताना फिजिशिअनचे पत्र बंधनकारक असून, महापालिकेच्या नोडल अधिकाऱ्यांना एचआरसीटीचा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात काढलेल्या पत्रकात आयुक्त जाधव यांनी सूचना दिल्या. कोरोना संशयित रुग्णांची बहुतेक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून कोविड आरटीपीसीआर न करता परस्पर एचआरसीटी स्कॅन केला जातो व रुग्णावर उपचार सुरू केले जातात. सदरची बाब शासकीय सूचनांचे उल्लंघन करणारी आहे. सर्व संशयित रुग्णांची एचआरसीटी स्कॅन करण्याचा निर्णय फक्त फिजिशियन घेऊ शकतात. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

लक्षणे नसलेल्यांनी एचआरसीटीऐवजी शक्यतो छातीचा एक्स- रे करावा,
मात्र, असे असतानादेखील परस्पर छातीचा एक्स-रे काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. त्यातून कोरोना रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत असल्याने एचआरसीटी करताना संबंधित रुग्णाचे नाव, वय, पूर्ण पत्ता, अचूक दूरध्वनी क्रमांक व आधारकार्डची छायांकित प्रत घ्यावी. एचआरसीटी अहवालामध्ये एचआरसीटी स्कोर नमुद करावा, एचआरसीटीचा स्कोअर जास्त असलेल्या सर्व रुग्णांची कोविड चाचणी करण्यासाठी विभागीय नोडल वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून कोविड चाचणी करावी. लक्षणे नसलेल्या कोविडबाधित रुग्णांचा एचआरसीटीऐवजी शक्यतो छातीचा एक्स- रे करावा, जेणेकरून स्कॅन सेंटरवरचा ताण कमी होईल व नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन व साथरोग अधिनियमांतर्गत कारवाई करणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी आदेशात म्हटले आहे. 

 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

हे आहेत नोडल अधिकारी 
पंचवटी विभाग - डॉ. विजय देवकर (९९२२०२०३०६) 
नाशिक रोड विभाग - डॉ. जितेंद्र धनेश्वर (९८९००५८६४५) 
पश्चिम विभाग - डॉ. चारुदत्त जगताप (९८५०८०८५६५) 
सातपूर व सिडको विभाग - डॉ. नवीन बाजी (९८२२०२५५१८) 
पूर्व विभाग - डॉ. विनोद पावसकर (९४२२२७५२२४)