पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

दिंडोरी (नाशिक) : तालुक्यातील वलखेड ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने विजयी उमेदवारांच्या समर्थकाला मारहाण केल्याची घटना वलखेड फाट्यावर घडली. या घटनेत एकावर तलवारीने वार करण्यात आले आहे. 

अशी आहे घटना

वलखेड ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाला. विनायक शिंदे गटाने सर्व आठ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर विजयी उमेदवार गावाकडे जात असताना वलखेड फाट्यावर पराभूत उमेदवारांच्या समर्थकांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मारहाण केल्याची तक्रारी दिंडोरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. विरोधी गटातील रघुनाथ पाटील यांच्या गटातील सर्व उमेदवार पराभूत झाल्यामुळे हा वाद निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्यात शिवीगाळ होऊन हाणामारी झाली. विजयी गटातील मतदार विनोद पडोळ यांच्या पायावर तलवारीने वार करण्यात आले. तसेच सचिन मेधणे यालाही मारहाण झाली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

दरम्यान, निवडणुकीशी कुठलाही संबंध नसतानाही पडोळ यांना मारहाण झाल्याचा आरोप शिंदे गटाने केला असून, दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तर, पाटील गटानेही शिंदे गटाविरोधात तक्रार दाखल केली आहे.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच