पराभूतांचा पारा चढला! वाटलेल्या मलिद्याची वसुली मोहीम सुरू झाल्याने पेच 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : गुलाल आपलाच...भाऊ तुम्ही यंदा ग्रामपंचायतीचे मेंबर झालाच म्हणून समजा... वातावरण आपल्या बाजूने आहे. अशा वल्गना करून उमेदवाराला विजयाचा आत्मविश्‍वास देणारे कार्यकर्ते अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे पराभूत उमेदवारांचा पारा चांगलाच चढला आहे. सगळी हौस-मौज पुरविली. मतदारांवरही आर्थिक प्रयोग केले. मग मत का नाही मिळाले, अशा शब्दांत कार्यकर्त्यांची झाडाझडती धोबीपछाड मिळालेल्या उमेदवारांकडून सुरू आहे. 

अन् बॉन्ड्री प्लेअरची झोप उडाली..

निफाड तालुक्यात ६० ग्रामपंचायतींसाठी विविध आघाड्या, नेते एकत्र येऊन पॅनल मैदानात उतरविले होते. फॉर्म दाखल केल्यापासून जिवाचे रान करून प्रचार केला. काहींनी तर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात मागे-पुढे पाहिले नाही. वॉर्डात कार्यकर्त्यांनी सांगितलेली रक्कम डोळे झाकून दिली. मात्र, ज्यांना पैसे दिले तिथेच घात झाला. अमुक इतकी रक्कम द्या, अख्खा वॉर्ड, वाडा, गल्ली पॅक करतो. मग एकगठ्ठा मतदान आपलेच, असे म्हणून उमेदवारांकडून अनेकांनी मलिदा लाटला. ओल्याचिंब पार्ट्या केल्या. मात्र, शेवटी पराभव झाला. त्यामुळे पराभूत उमेदवारांची सटकली असून, आता वाटलेल्या मलिद्याची वसुली मोहीम सुरू झाल्याचे चित्र आहे. 
शेवटच्या तीन-चार दिवसांत गावागावांत पैशांचा पाऊस पडला. ज्यांच्या जिवावर निवडणूक लढवली त्यांना हजारो, लाखोंची बंडले दिली. मात्र, त्या तुलनेत मतदान न झाल्याने निसटता पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला. ज्यांना विशेष मलिदा दिला होता तिथे अपेक्षित मतदान झालेच नाही. त्यामुळे चिडलेल्या उमेदवारांचे आता ‘पैसे परत करा, नाहीतर...’ असे फोन खणखणायला लागल्याने बॉन्ड्री प्लेअरची झोप उडाली आहे. आता पैसे द्यायचे कोठून हा प्रश्‍न त्यांच्यापुढे असून, पार्ट्या झोडण्यावरच पैसा खर्च झाला. प्रचारसाहित्य, ओल्या पार्ट्या, तसेच गाव, वॉर्ड पॅक करण्यासाठी उमेदवारांचा खर्च दिवसाला हजारो, लाखोंच्यावर होता. मात्र, त्या तुलनेत त्यांच्या हाती पराभव लागला. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

दगाफटका झाल्याने टेन्शन जाईना... 

पराभवामुळे अजूनही काही उमेदवार घराबाहेर पडलेले दिसत नाहीत. पैसा खर्च करूनसुद्धा आपल्याला अमुक ग्रुप, व्यक्तीने मतदान न केल्याचे शल्य अनेक उमेदवारांच्या मनात आहे. काहींनी मागील पाच वर्षांत जेवढे कमावले तेवढेही गेले अन्‌ कर्जही झाले, अशी स्थिती झाली आहे. आपण निवडून येणार याची चांगलीच शाश्‍वती असल्याने अनेकांनी तर दिल खोल के पैसा खर्च करून टाकला. मात्र, मतमोजणीच्या दिवशी मतांची आकडेवारी हाती पडताच त्यांना आपल्यासोबत दगाफटका झाल्याची जाणीव झाली असून, ते टेन्शन अजून जात नाही.  

 हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क