परिवहन मंत्रालयामुळे शहर बससेवेचा मुहूर्त टळणार; शिवसेनेकडून अडवणूक 

नाशिक : महापालिकेने प्रजासत्ताक दिनापासून शहर बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीत शिवसेनेकडे परिवहन खाते असल्याने परिवहन परमिट परवानगी नाकारली जात असल्याचे बोलले जात आहे. परमिटसाठी महापालिकेने तीनदा स्मरणपत्रे पाठवूनही दाद मिळत नाही. 

महापालिकेची तयारी पुर्ण 

शहर विकासाला चालना मिळावी, या हेतूने महापालिकेने राज्य परिवहन महामंडळाची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बससेवेसाठी आग्रह होता. ग्रॉस कॉस्ट कटिंग तत्त्वानुसार बस ऑपरेटिंगचे काम खासगी मक्तेदाराकडे दिले आहे. पहिल्या टप्प्यात अडीचशे बस सुरू होणार आहेत. महापालिकेतर्फे बससेवेसाठी पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत. वाहक व चालकांची नियुक्ती खासगी मक्तेदारामार्फत होणार आहे. बससेवा सुरू करण्याची तयारी महापालिकेने पूर्ण केली असून, त्यासाठी २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त निश्‍चित केला आहे. शहर बससेवा एकदा सुरू झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत बंद करता येणार नाही. पाणी, आरोग्य व रस्ते याप्रमाणेच बससेवेची गरज राहणार आहे. बससेवा सुरू करायची असेल, तर त्यासाठी राज्य शासनाच्या परिवहन विभागाचे परमिट आवश्‍यक असते.

परमिटची प्रक्रिया पूर्ण पण..

महापालिकेने तीनदा परमिटसाठी स्मरणपत्रे दिले. मात्र अद्यापपर्यंत त्याचे उत्तर आलेले नाही. महापालिकेने परिवहन विभागाला फेब्रुवारी २०२० मध्ये पत्र पाठवून परिवहन परमिटची मागणी केली होती. परिवहन आयुक्तांना प्रस्ताव पाठवून परमिटची पूर्तता पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. परिवहन विभागानेही नाशिकच्या आरटीओमार्फत परमिटची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यासदर्भातील अहवाल परिवहन आयुक्तांमार्फत परिवहन सचिवांकडे पाठविला. मात्र परिवहन सचिवांकडून अद्यापही परवानगी मिळत नाही. परमिटशिवाय बससेवा सुरू केल्यास अनधिकृत सेवा म्हणून गणली जाईल. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापासून सेवा सुरू करण्यात प्रशासनाची अडचण होणार आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

परिवहन खाते शिवसेनेकडे 

महापालिकेत भाजपची, तर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. त्यामुळे परिवहन मंत्रालयाकडून अडवणुकीचे धोरण अवलंबिले जात असल्याचे बोलले जात आहे. बीएस-६ प्रकारच्या बसवरून शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी विरोध केला होता. त्यामुळे शहर बससेवेत शिवसेना अडथळा ठरत असल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा