पर्यावरणपूरक फटाके खरेदीकडे नाशिककरांचा कल

पर्यावरण पूरक फटाके,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. आनंदाचा उत्सव असलेल्या दिवाळीनिमित्त लवंगी फटाके, फुलझाडे, भुईचक्रासह निरनिराळ्या प्रकारचे फटाके बाजारामध्ये दाखल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक फटाके खरेदीकडे नाशिककरांचा कल पाहायला मिळत आहे. दरम्यान, यंदा फटाक्यांच्या किमतीत ३० टक्के वाढ झाली आहे. (Nashik Diwali)

अवघ्या चार दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहेे. गरीब असो अथवा श्रीमंत हे आपापल्या परीने दिवाळीचा सण साजरा करण्यास सज्ज झाले आहेत. दिव्यांच्या लखलखाटासह फटाक्यांच्या आतषबाजीलाही तेवढेच महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर दिवाळीतील आतषबाजीसाठी खास विविधरंगी व आकारांतील फटाके विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये फटाक्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्समधून फटाके घेण्यासाठी नाशिककर लहान मुलांसह गर्दी करत आहेत. (Nashik Diwali)

दरवर्षीप्रमाणे तामिळनाडूच्या शिवकाशी येथून लाखो रुपयांचे फटाके विक्रीसाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या फटाक्यांमध्ये लवंगी फटका, सुरसुरी, भुईचक्र, झाड, सात, बारा, २५ तसेच 100 या पटीत शोभेचे शॉटस‌्, रॉकेट बाण यासह मुलांसाठीच्या खास फटाक्यांचा यात समावेश आहे. विक्रेत्यांच्या माहितीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किमतीत ३० टक्के वाढ झाली आहे. पण स्टाॅल्स‌्वर खरेदीसाठी होणारी गर्दी बघता शहरवासीयांचा उत्साह तसुभर कमी झाला नाही. विशेष म्हणजे फटाके घेताना नागरिकांचा पर्यावरणाच्या रक्षणाकडेही कल पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही फटाक्यांमध्ये पर्यावरणपूरक तसेच १२५ डेसिबल आवाजापर्यंतची मर्यादा पाळली जात आहे. (Nashik Diwali)

ओझर, सिन्नरला खरेदी

नाशिक शहर व उपनगरांमध्ये फटाक्यांचे शेकडो स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. पण, ओझर व सिन्नर येथे थेट कंपनी आउटलेटमुळे कमी दरांत फटाके उपलब्ध होतात. त्यामुळे शहरातील विविध इमारती, गृहनिर्माण संस्थांमधील रहिवासी एकत्रितरीत्या ओझर व सिन्नरला जाऊन फटाके खरेदी करताना दिसत आहेत.

दिवाळीसाठी विविध प्रकारचे पर्यावरणपूरक फटाके विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. त्याला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या नियमानुसार १२५ डेसिबलच्या आत व पर्यावरणपूरक फटाक्यांचीच आम्ही विक्री करताे.

-अमोल बर्वे, अध्यक्ष, नाशिक फटका असोसिएशन.

या फटाक्यांवर बंदी

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार दिवाळीमध्ये फुटफुटी किंवा तडतडी, मल्टिमिक्स, चिलपाल, चिडचिडिया, बटरफ्लाय या नावाने ओळखले जाणारे पिवळा फॉस्फरसयुक्त असलेले अत्यंत विषारी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी असेल. मनाई केलेले आपटबार व उखळी दारू उडविण्यासह दहा हजार फटाके असलेली माळ विक्री करण्यास निर्बंध आहेत. लहान मुलांना फटक्यांची विक्री करु नये. शांतता क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे फटाके फाडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा :

The post पर्यावरणपूरक फटाके खरेदीकडे नाशिककरांचा कल appeared first on पुढारी.